MSRT Bus : राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने एसटी महामंडळाच्या बसचा वापर केला जातो. प्रामुख्याने ज्या शहरांमध्ये जाण्यासाठी थेट रेल्वेची सुविधा नाही अशा ठिकाणी एसटी बसचा वापर होतो. एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एसटी महामंडळ देखील नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. वेगवेगळे कल्याणकारी निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून केला जातो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाचे प्रवासी संख्या वाढवण्यासाठी महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीमध्ये 100% सवलत मिळत आहे.
म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास करता येत आहे. अशातच आता राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे आता एसटी महामंडळाच्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. कारण की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता नवीन विद्युत बस दाखल झाल्या आहेत. 10 नवीन विद्युत बस ST कडे आल्या आहेत. आता या बस ठाणे-नाशिक तसेच मुंबई-नासिक यांसारख्या मार्गांवर सुरू केल्या जाणार असे वृत्त समोर आले आहे. मुंबई आणि ठाणे या महानगरापासून दोनशे किलोमीटर लांबीवर असलेल्या शहरादरम्यान या नवीन बसेस चालवल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.
5 हजारापेक्षा जास्त विद्युत बस ST ताफ्यात येणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, एसटी पुनरुज्जीवन आराखडा अंतर्गत एसटी महामंडळाच्या ताब्यात ५,१५० विद्युत (ईलेक्ट्रिक) बस येणार आहेत. यामध्ये दोन प्रकारच्या बस राहणार आहेत. १२ मीटरच्या २,८०० आणि ९ मीटरच्या २,३५० बस ST महामंडळाच्या ताफ्यात लवकरच सामील होणार आहेत.
किती तिकीट दर आकारले जाणार
एका मीडिया रिपोर्ट नुसार या इलेक्ट्रिक ST बसचे भाडे ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली आहे. मात्र अजून या समितीने निर्णय घेतलेला नाही. यामुळे इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर काय राहणार हा मोठा सवाल आहे. पण समितीचा अहवाल आणि त्यावर निर्णय होईपर्यंत साध्या बसच्या तिकीट दरातच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता येऊ शकतो अशी माहिती काही प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर येत आहे. विशेष म्हणजे मार्च 2024 पर्यंत महामंडळाच्या ताफ्यात दीडशे इलेक्ट्रिक बस येणार आहेत. यामुळे राज्यातील एसटी प्रवाशांचा प्रवास निश्चितच गतिमान होणार आहे.