Ahmednagar News :- काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांना खरेदी करण्यास न परवडणारा टोमॅटो आता थेट जनावरांसमोर ओतण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. सध्यस्थितीत टोमॅटोची मातीमोल दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतातून टोमॅटो बाजारात आणणे देखील परवडत नसल्याने अनेक शेतकरी टोमॅटो जनावरांना खाऊ घालत आहेत.
प्रसंगी टँकरद्वारे पाणी देऊन मोठ्या कष्टाने पिकवलेला माल मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे जनावरांपुढे ओतण्याची वेळ आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. एकीकडे कांद्याचे दर अडीच हजारांवर स्थिर आहेत मात्र दुसरीकडे टोमॅटोचे दर मात्र २०० वरून थेट २ रूपयांवर आले आहेत.
सध्या जिल्ह्यासह राज्यात अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाच मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालास भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
त्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तर मिळणाऱ्या तुटपुंज्या भावामुळे पावसाने रडवले अन् टोमॅटोने फसवले अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाव कोसळल्याने सध्या राज्यातील टोमॅटो व कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
विशेषतः राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, सध्याचा मिळणारा भाव पाहता शेतकाऱ्यांना शेतातून बाजार समितीत माल आणण्यासाठी येणारा खर्च देखील माल विकून वसूल होत नाही.
टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्ला सध्या अवघे ५० ते १०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे वाहतूक खर्चच मिळेना तर मग मशागत, औषध, पाणी, फवारणी, खते यावर झालेला खर्च कसा वसूल होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अत्यल्प पाऊस पडलेला आहे. दरम्यान मागील महिन्यापर्यंत टोमॅटोला विक्रमी दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. परिणामी आवक वाढल्याने दर कोसळले आहेत.
पर्यायाने खर्च वसूल होत नसल्याने आणि पावसाअभावी चाऱ्याची देखील टंचाई असल्याने टोमॅटो जनावरांपुढे ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो २००-८००, वांगी ५०० – ३०००, फ्लावर ५००- ३५००, कोबी २०० – १०००, काकडी २०० १५००, गवार ३०००- ८०००, घोसाळे १०००-३०००, दोडका ५०० – २०००, कारले १०००-२०००, भेंडी १५००- ३५००, वाल १००० ३०००, घेवडा १०००-४०००, तोंडुळे १०००-२०००, डिंगरी २०००-३०००, बटाटे १२०० – १७००, लसूण ८००० १६,०००, हिरवी मिरची १५००-३०००, शेवगा १५०० ४५००, भु.शेंग ४००० – ४५००, लिंबू २०००-६०००, आर्द्रक ७५०० – ११०००, गाजर २००० – २२००, दु. भोपळा २०० १५००, मका कणसे ४००-१०००, शि. मिरची ८०० – १६००, मेथी २०००-३०००, कोथिंबीर १०००-२०००, पालक ५०० १०००, शेपू भाजी १००० २०००, चवळी २००० – ३५००, बीट १०००-१५००, वाटाणा २०००- ५५००.