Thane Borivali Tunnel : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून विविध रस्ते विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यात ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत ठाणे ते बोरीवली दरम्यान भुयारी मार्ग विकसित केला जाणार आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे मोठमोठ्या महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सामान्य बाब बनत चालली आहे. ठाणे आणि बोरिवली मध्ये देखील वाहतूक कोंडीची समस्या जटील बनत आहे.
वाहतूक कोंडीमुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान ठाणे ते बोरिवली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी ठाणे ते बोरिवली दरम्यान भुयारी मार्ग विकसित होणार आहे.
हा मार्ग एमएमआरडीएकडून तयार केला जाणार असून आताच या मार्गाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला जाणार आहे.
यासाठी एमएमआरडीएने निविदा काढल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत जो कोणी यशस्वी ठरेल त्या सल्लागाराला काम सुरू झाल्यापासून ते काम संपेपर्यंत प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
कसा आहे मार्ग
हा मार्ग 11.8 किलोमीटर लांबीचा संपूर्ण भुयारी मार्ग राहणार आहे. या भुयारी मार्गात 10.25 किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांचा समावेश राहणार आहे. खरंतर एम एम आर डी ए ने यासाठी आधी जो प्रकल्प आराखडा तयार केला होता त्या आराखड्यात काहीसा बदल करण्यात आला आहे.
यामुळे या प्रकल्पाचा खर्च 11235 कोटींवरून 16000 कोटी पर्यंत वाढला आहे. वास्तविक, या प्रकल्पासाठीच्या निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत. यामुळे या प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार अशी आशा होती.
मात्र या प्रकल्पासाठी वन विभागाची आणि वन्यजीव विभागाची परवानगी घ्यावी लागणार असल्याने या प्रकल्पाचे काम आणखी काही काळ रखडणार असे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेले टीबीएम मशीन मुंबईत येण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. अशातच आता एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला असून यासाठी निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सल्लागारासाठी इच्छुक कंपन्यांना आता 25 सप्टेंबर पर्यंत निविदा सादर करता येणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरीवली हा प्रवास मात्र वीस मिनिटात पूर्ण होणार असा दावा केला जात आहे.