Soybean Farming : येत्या काही दिवसात मान्सूनला सुरुवात होणार आहे. मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीला देखील वेग येणार आहे. यंदा खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे.
यावर्षी हवामान खात्याने चांगल्या मान्सूनची शक्यता वर्तवली असल्याने सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असा अंदाज आहे. दरम्यान जर तुम्हीही यावर्षी सोयाबीन पेरणी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण सोयाबीन पेरणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ? जेणेकरून सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळेल याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन पेरणी करताना या गोष्टींची काळजी घ्या
पेरणीसाठी योग्य वाणांची निवड करा : यंदा मुबलक पाऊस होणार असा अंदाज आहे. यामुळे सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळू शकते. मात्र या पिकातून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फुले किमया, फुले संगम, जे एस ३३५, जेएस ९३०५, एमएयुएस ७१, एमएयुएस ६१२ इ. सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
पेरणी योग्य वेळेत करा :
सोयाबीन पेरणीचा टाइमिंग हा देखील उत्पादनावर फरक आणतो. यामुळे जर तुम्हाला चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक राहणार आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा अर्थातच खरीप हंगाम 2024 मध्ये सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत केली पाहिजे. जेव्हा ७५ ते १०० मि. मी. पाऊस होईल अन जमिनीत पुरेशी आर्द्रता असेल त्यावेळी सोयाबीनची पेरणी केली पाहिजे.
बीज प्रक्रिया अवश्य करा :
सोयाबीनची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीनची एकरी उत्पादकता कमी झाली आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीन पेरणी करताना शेतकरी बांधव काही छोट्या-मोठ्या चुका करतात. अनेकजण सोयाबीनची पेरणी बीज प्रक्रिया न करता करतात. यामुळे देखील उत्पादनात घट येते. परिणामी पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशकाची प्रक्रिया करुन बियाणे सावलीमध्ये वाळवून योग्य वेळी पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
बियाणे पेरणी योग्य अंतरावर करा :
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, सोयाबीनची पेरणी ४५ बाय ५ सें. मी. किंवा ७.५ सें. मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्टरचलित सीड ड्रिलच्या साहाय्याने केली पाहिजे. बियाणे २.५ ते ३.० सें. मी. खोलीपेक्षा जास्त खोल पेरु नये. अन्यथा बियाण्याची उगवण कमी होते आणि उत्पादनात घट येऊ शकते.
बियाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे :
सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर समजा बियाण्याची उगवण क्षमता ही 70% पेक्षा कमी असेल तर मात्र बियाण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे.