Surat Chennai Greenfield Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत संपूर्ण देशभरात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. या परियोजनेअंतर्गत विकसित होणारे महामार्ग हे सर्व ग्रीन फिल्ड महामार्ग राहणार आहेत. यामुळे शहरा-शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग हा देखील भारतमाला परियोजने अंतर्गत विकसित होणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातूनही जाणार आहे. मध्य महाराष्ट्रातील तीन आणि मराठवाड्यातील दोन अशा पाच जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे.
अहमदनगर जिल्हाबाबत बोलायचं झालं तर या महामार्गाची जिल्ह्यात 141 किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. कृषी, पर्यटन, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला या महामार्गामुळे कलाटणी मिळणार आहे.
सध्या या प्रकल्पासाठी डीपीआरचे काम सुरू असून हा महामार्ग प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. खरेतर या प्रकल्पासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात दोन इंटरचेंज तयार केले जाणार आहेत.
यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील नान्नजला आणि अरणगाव आणि गरडाचे पाटोदा गावाच्या मधोमध असे दोन इंटरचेंज तयार केले जाणार आहेत.
या दोन्ही इंटरचेंजसाठी तीन गावांमध्ये जमिनीचे संपादन केले जाणार असून या गावांमधील 70 हेक्टर जमीन या इंटरचेंजसाठी संपादित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी सर्वेचे काम पूर्ण झाले असून भूसंपादन प्रक्रिया येत्या काळात राबवली जाणार आहे.
खरे तर हा मार्ग जामखेड तालुक्यातील बारा गावांमधून जाणार आहे. या बारा गावांमध्ये या महामार्गाची लांबी 26 किलोमीटर एवढी राहणार असून यासाठी 178 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. मात्र या महामार्गाला जामखेड तालुक्यात फक्त दोनच ठिकाणी इंटरचेंज राहणार आहेत.
यामुळे तालुक्यातील नागरिकांना या महामार्गाने प्रवास करण्यासाठी नान्नज आणि अरणगाव परिसरातचं यावे लागणार आहे. परिणामी, या महामार्गाचा तालुक्यातील नागरिकांना किती फायदा होणार? हे तर आगामी काळातचं समजू शकणार आहे.
पण, या महामार्ग प्रकल्पामुळे अहमदनगर सहित राज्यातील पाच जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळणार असा दावा सरकारच्या माध्यमातून केला जात आहे.
हा महामार्ग प्रकल्प सुरत आणि चेन्नई या दोन व्यावसायिक शहरांसाठी तर महत्वाचा आहेचं शिवाय राज्यासाठी देखील हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल अशी आशा आहे.