Surat Chennai Greenfield Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परीयोजनेअंतर्गत सध्या देशात वेगवेगळ्या महामार्गांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे. या परियोजनेअंतर्गत केंद्र शासनाचा देशातील प्रमुख शहरांना परस्परांना जोडण्याचा मानस आहे.
याच परियोजनेचा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रासाठी अतिमहत्वाचा असून या महामार्गाचे सध्या भूसंपादन सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यात या महामार्गाचे भूसंपादन वेगात सुरू असले तरी देखील या मार्गाच्या भूमापन प्रक्रियेस खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, सडे, वांबोरी या गावातील शेतकऱ्यांनी काढून विरोध केला होता. 15 सप्टेंबर 2021 रोजी सडे वांबोरी रोडवर सडे रेल्वे चौक जवळील खडांबे नाका या ठिकाणी वर नमूद केलेल्या गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता.
त्यावेळी शेतकऱ्यांनी भूमापन प्रक्रिया होऊ दिली नव्हती. शेतकऱ्यांनी तेव्हा शेतजमिनीच्या मोबदल्यातबाबत नाराजी व्यक्त केली होती, तसेच महामार्गामध्ये जमिनी जाणारे बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांच्या शेतजमिनी गेल्या तर ते भूमिहीन होतील.
शिवाय महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढेल आणि यामुळे इतर शेती देखील नापीक बनेल. यामुळे त्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला. यामुळे काल प्रशासनाने पोलीस संरक्षणात भूमापन प्रक्रियेला सुरुवात केली.
मात्र शेतकरी बांधव आपल्या मागण्यांवर ठाम होते, यामुळे श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार व राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्वतः जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. ही भेट सकारात्मक ठरली.
यावेळी श्रीरामपूर प्रांताधिकारी अनिल पवार यांनी शेतकऱ्यांना भूमापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी देखील चर्चेनंतर भूमापनास विरोध केला नाही. अशा पद्धतीने काल राहुरी तालुक्यातील खडांबे या ठिकाणी सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे च्या भूमापनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.