राज्यभरात ऊस गाळप हंगाम सध्या सुरू असून जूनच्या आडसाली लागणीना वीस महिने कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ऊसाला तुरा देखील आला असून सुद्धा उसाला तोड येत नसल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे.
दरवर्षीप्रमाणे कारखान्यांचे तोडीचे कोणते ही व्यवस्थापन दिसून येत नसल्यामुळे ऊस तोडणी विलंब होत आहे. तर मुकादमाचे लक्ष उसाकडे तर जाईनाच म्हणून शेतकऱ्यांना आता उसाला काडी लावून ऊस कारखान्यांना पाठवत आहेत.
ऊस पाचटात सेंद्रिय कर्बाचा भलामोठा साठा आसतो.तर ज्या शेतकऱ्यांचा ऊस काडी न लावता तोडला जातो तो आमचा दृष्टीने खुप भाग्यवान शेतकरी आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाचटाला काडी लावून जमीन नापीक करायची की त्याला कुजवून माती समृद्ध करायची हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे.
ऊस तुटून गेल्यानंतर पाचटी चे व्यवस्थापन करताना
पुढील घटक लक्षात घ्यावेत.
1. ऊस तुटून गेल्यानंतर दोन्ही सरी मधील पाचट हे ऐका सरी मध्ये दाबून घ्यावी.
2. पाचटीवर एक पोत युरिया आणि एक पोत सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा.
3.पहिल्या पाण्यातून पाला कुजवणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
4.ट्रायकोडर्मा बुरशीमध्ये पाचट कुजवण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे त्याचा वापर ही करावा.
शेतकर्याची पाचट विषयी बरेच गैरसमज आहेत. पाचट ठेवल्यामुळे हुमणी आळीचा प्रादुर्भाव वाढतो. हा खूप मोठा गैरसमज आहे.बर्याच शेती तज्ज्ञांशी वार्तालाब केल्यावर असं जाणवलं की पाचट ठेवणे आणि हुमणी अळीचा काही संबंध नाही. आमचा गावातही पाला पेटवण्याची प्रथा आहे.
तर दुसरीकडे वर्षानुवर्षे पाचट कुजवणे चालू आहे. हुमणी गेली पाच वर्ष बघायलाही सापडत नाही. जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पाचटाचे विघटन करणे ही एक संधी आहे. आपल्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बही वाढवता येते आणि इतर रोगकारक बुरशींवर नियंत्रण ही मिळवता येते.