Sugarcane Farming : राज्यात सोयाबीन, कापूस कांदा या पिकांप्रमाणेच उसाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची जवळपास संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे.
येथील शेतकऱ्यांचे ऊस पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र असे असले तरी उसाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी आणि चांगला साखर उतारा मिळवण्यासाठी त्याच्या सुधारित वाणांची लागवड करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत आज आपण एका नव्याने विकसित झालेल्या आणि चांगला साखर उतारा असलेल्या उसाच्या वाणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उसाचा नव्याने विकसित झालेला फुले १३००७ वाण
उसाची ही जात अलीकडेच विकसित झाली आहे. ही जात महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे. ही जात अधिक उत्पादनासाठी आणि अधिक साखर उताऱ्यासाठी विशेष ओळखली जात आहे.
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फुले २६५ आणि कोएम ०२५४ या जातीचा संकर करून ही जात विकसित करण्यात आली आहे. ही जात को 86032 या जातीपेक्षा ऊस उत्पादनात आणि साखर उत्पादनात सरस आहे.
यामुळे अल्पावधीतच ऊस उत्पादकांमध्ये हा वाण लोकप्रिय बनला आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे सुरू आडसाली आणि पूर्व अशा तिन्ही हंगामामध्ये याची लागवड केली जाऊ शकते.
या नव्याने विकसित झालेल्या जातीपासून सुरू हंगामात हेक्टरी १२९ टन, पूर्वहंगामात १३६ टन, आडसाली १४७ टन एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
तसेच खोडवा उत्पादन हेक्टरी १२१ टन एवढे मिळाले आहे. या जातीपासून 14.22 % साखर उतारा मिळतं असल्याचे बोलले जात आहे.
ही जात लालकुज, काणी, मर, पिवळा पानांच्या रोगास प्रतिकारक्षम, तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोइंग रोगांना प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोबतच खोड कीड, कांडी कीड व लोकरी मावा किडींना कमी बळी पडणारी जात म्हणून हा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनला आहे. या जातीला तुरा उशीरा व कमी प्रमाणात येत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.