Sugarcane Farming : ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे बागायती पीक. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. भारतीय कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देखील उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत.
दरम्यान आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अलीकडेच विकसित केलेल्या फुले ११०८२ (कोएम ११०८२) या सुधारित जातीची आज आपण माहिती पाहणार आहोत. ही जात 2021 मध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव केंद्राने विकसित केली आहे.
नवी दिल्ली येथे दि. २६ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या ८९ बैठकीत फुले ११०८२ (कोएम ११०८२) हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आलेला आहे. उसाच्या या जातीची विशेषता म्हणजे हा एक लवकर पक्व होणारा वाण आहे.
तसेच, कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक देतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्याचा साखर उतारा वाढविण्यासाठी हा वाण नक्कीच फायदेशीर ठरणार असून यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. हा एक जलद गतीने वाढणारा वाण आहे.
मात्र हा एक लवकर पक्व होणारा वाण असल्याने तुरा येण्याची समस्या यामध्ये दिसते. त्यामुळे या वाणाची वेळेवर तोडणी झाली तरच शेतकऱ्यांचा फायद्याचा ठरतो नाहीतर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची देखील भीती असते.
कृषी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाने विकसित केलेली ही जात चाबूक काणी व पाने पिवळी पडणाऱ्या रोगास प्रतिकारक असून मर आणि लालकूज या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे.
ऊसाची ही जात खोड किड, कांडी किड आणि शेंडे किडीस कमी प्रमाणात बळी पडते. कृषी शास्त्रज्ञांनी उसाची ही जात सुरू आणि पूर्व हंगामात लागवडीसाठी शिफारशीत केलेली आहे.
नक्कीच या अलीकडेच विकसित झालेल्या जातीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे आणि यामुळे त्यांना मोठा आर्थिक लाभ देखील होणार आहे. हा वाण राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाचा ठरेल यात शंकाच नाही.