Sugarcane Farming : राज्यात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अलीकडे मात्र हे नगदी पिक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. उसाच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने आणि ऊस तोडणी तसेच ऊस वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने हे पीक आता शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे.
शिवाय ऊसाला अपेक्षित असा भावही मिळत नाहीये. यामुळे आता ऊस पिकाला पर्याय म्हणून राज्यातील बहुतांशी शेतकरी इतर पिकाच्या लागवडीत रस दाखवत आहेत. मात्र असले तरी राज्यात आजही उसाचे लागवडीखालील क्षेत्र उल्लेखनीय आहे. दरम्यान यावर्षीचा गळीत हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
येत्या आठवड्यात याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी कर्नाटक राज्यातून समोर येतेय. हाती आलेल्या माहितीनुसार कर्नाटक मध्ये तब्बल 22 कारखान्यांनी ऊसाला तीन हजारापेक्षा अधिकचा भाव जाहीर केला आहे. यात सौंदत्ती तालुक्यातील रेणुका साखर कारखान्याने सर्वाधिक दर प्रतिटन 3773 रुपये, चिकोडी तालुक्यातील वेंकटेश्वर कारखान्याने 3693 रुपये दर जाहीर केला आहे.
कर्नाटकमध्ये उसाला चांगला विक्रमी भाव जाहीर करण्यात आला असल्याने आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील चांगला विक्रमी भाव मिळणार असे वाटतं आहे. खरतर, राज्यात गेल्या हंगामात फक्त 13 साखर कारखान्यांनी 3 हजारापेक्षा अधिकचा भाव दिला होता. 198 साखर कारखान्यांनी 3,000 पेक्षा कमी भाव दिला होता. तसेच 12 साखर कारखाने असे होते ज्यांनी दोन हजारापेक्षा कमी भाव दिला होता.
दरम्यान, यावर्षी उसाचे उत्पादन कमी होणार असल्याने शेतकऱ्यांची चांगला भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे. वास्तविक केंद्र शासनाने 10.5% साखर उतारा असलेल्या उसासाठी 3150 रुपये प्रति टन एवढी एफ आर पी जाहीर केली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना किमान एवढा भाव मिळणार आहे. मात्र जर साखर उतारा 10.5% पेक्षा कमी आला तर एफ आर पी मध्ये घट होते आणि साखर उतारा 10.5% पेक्षा अधिक आला तर एफ आर पी मध्ये वाढ होऊ शकते.
तसेच एफ आर पी मधून वाहतूक खर्च आणि तोडणीचा खर्च देखील वजा केला जातो. एकंदरीत कर्नाटक मध्ये ऊसाला चांगला विक्रमी भाव जाहीर झाला असल्याने आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या देखील आशा पल्लवीत झाल्या असून आपल्या राज्यातही ऊसाला चांगला विक्रमी भाव जाहीर होईल असे बोलले जात आहे.