Sugarcane Crushing Season : महाराष्ट्रात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड आहे. ऊस एक बागायती आणि नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ऊस पिकासाठी अलीकडे उत्पादन खर्च अधिक लागत आहे.
शिवाय अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील ऐरणीवर येऊ लागला आहे. याव्यतिरिक्त ऊस तोडणी मजुरांकडून आणि ऊस वाहतूकदारांकडून ऊस उत्पादकांची पिळवणूक केली जात आहे. यामुळे आता राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकाला पर्याय शोधताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे, पावसाच्या मोठ्या खंडामुळे उसाचे उत्पादन घटणार असल्याचा दावा केला जात आहे.
यावर्षी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात या चालू ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत 56% कमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. म्हणून यंदा उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन कमी होणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अशातच यंदा उसाचा गळीत हंगाम केव्हा सुरू होणार याबाबत शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे.
दरम्यान उसाच्या यंदाच्या गळीत हंगामाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी उसाचा गाळप हंगाम हा दिवाळीनंतरच सुरू होणार आहे. खरंतर गेल्यावर्षी गाळप हंगाम लवकर सुरू झाला होता. 15 ऑक्टोबरलाच गाळप हंगामाची सुरुवात करण्यात आली होती. यंदा मात्र गाळप हंगाम दिवाळीनंतर अर्थातच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे.
गेल्या वर्षी राज्यातील बहुतांशी साखर कारखानदारांनी गाळप हंगाम लवकर सुरू करा अशी मागणी केली होती. यंदा मात्र एकाही साखर कारखान्याने अशी मागणी केलेली नाही. यामुळे यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतरच सुरू होणार असे साखर उद्योगातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. विशेष बाब अशी की, राज्यातील अनेक कारखाने नोव्हेंबरच्या मध्यानंतरच हंगाम सुरू व्हावा यासाठी आग्रही देखील आहेत.
याचे मुख्य कारण म्हणजे जर लवकर हंगाम सुरू केल्यास कोवळा ऊस तोडला जातो, अशा कोवळ्या उसाचे वजन खूप कमी भरते यामुळे साखर कारखानदारांना योग्य रिकव्हरी मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे देखील यामुळे नुकसानच होते. पण जर परिपक्व ऊस कारखान्यात आला तर साखर कारखानदारांना चांगली रीकवरी मिळते आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगले वजन मिळत असल्याने याचा लाभ मिळतो.
यामुळे दिवाळीनंतरच हंगाम सुरू झाला पाहिजे असे साखर कारखानदारांना वाटत आहे. विशेष म्हणजे मजूरही दिवाळीनंतरच येण्यास उत्सुक असतात. तसेच नोव्हेंबरमध्ये थंडीची तीव्रता जास्त राहते आणि यामुळे साखर उताऱ्यात वाढ होते. यामुळे उसाचा यंदाचा गळीत हंगाम हा नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतरच सुरू व्हावा अशी साखर कारखानदारांची इच्छा आहे.