Successful Farmer : देशातील शेतकरी (Farmers) आता पीक पद्धतीत बदल करू लागले आहे. यामुळे त्यांना फायदा देखील मिळत आहे. शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची लागवड (Orchard Planting) करीत आहेत.
यामध्ये विदेशी फळांचा देखील समावेश आहे आणि विशेष म्हणजे या फळांची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर देखील ठरत आहे. शेतीमध्ये पारंपरिक पिकाला फाटा दिला जात आहे तसेच सुशिक्षित नवयुवक देखील आता शेतीमध्ये उतरू लागले आहेत.
सुशिक्षित नवयुवक शेती क्षेत्राकडे वळल्याने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील आता वावर वाढू लागला आहे. आज आपण अशाच एका उच्चविद्याविभूषित आणि पेशाने डॉक्टर असलेल्या एका अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.
विशेष म्हणजे या अवलिया डॉक्टरांनी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून (Dragon Fruit Farming) तब्बल दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या यशोगाथेविषयी.
हैदराबादचे रहिवासी असलेले श्रीनिवास राव माधवरम हे व्यवसायाने/पेशाने डॉक्टर आहेत. श्रीनिवास सांगतात की, दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत रुग्णांवर उपचार करतात.
त्यानंतर ते त्यांच्या शेतात निघून जातात. गेल्या 5 वर्षांपासून ते ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. त्यांनी 12 एकर जमिनीवर सध्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. त्यातून वर्षाला दीड कोटी रुपयांची कमाई होत आहे.
श्रीनिवास यांनी बोलतांना सांगितले की, त्यांना 2016 मध्ये पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट दिसले होते. त्यांच्या घरी एक कार्यक्रमादरम्यान त्यांच्या भावाने ड्रॅगन फ्रूट घरी आणले होते तेव्हा पहिल्यांदा श्रीनिवास यांनी ड्रॅगन फ्रुट बघितले.
मग काय त्यांनी या फळाची सर्व जन्म कुंडलीचं शोधून काढली. हे फळ कुठं विकले जाते, कुठून आयात केले जाते आणि हे फळ नेमकं कसं तयार होते यावर त्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी संशोधनाअंती त्यांना कळले की याच्या शेकडो प्रजाती आहेत, पण भारतात फार कमी शेतकरी त्याची लागवड करतात.
पहिल्यांदा अपयश
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याकडून ड्रॅगन फ्रूटची 1000 रोपे विकत घेतली, पण त्यातील बहुतांश रोपटे खराब झाली. भारतातील हवामानात त्या रोपांची वाढ होऊ शकत नव्हती हे कारण होते.
70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. यानंतर श्रीनिवास यांनी गुजरात, कोलकाता यासह अनेक शहरांना भेटी दिल्या. तिथल्या रोपवाटिकेत गेलो, बागायतीशी संबंधित लोकांना भेटलो, तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांना कळले की व्हिएतनाममध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मग काय ते व्हिएतनामला रवाना झाले.
श्रीनिवास सांगतात की, आधी त्यांनी तिथल्या एका हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटीला भेट दिली, जवळपास 7 दिवस राहिले आणि तिथल्या प्रोफेसरकडून ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती मिळवली.
यानंतर श्रीनिवास ड्रॅगन फ्रूटची शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी गेले. श्रीनिवास यांना या फळाची शेतीबद्दल त्या शेतकऱ्याने सविस्तर माहिती दिली, यासाठी श्रीनिवास यांना एकवीस हजार रुपये मोजावे लागले.
श्रीनिवास रोज त्या शेतकऱ्यासोबत शेतात जाऊन त्याच्याकडून प्रशिक्षण घ्यायचा. वियतनामध्ये श्रीनिवास यांनी जवळपास आठवडाभर ड्रॅगन फ्रुट च्या शेती विषयी प्रशिक्षण घेतले.
13 देशांना भेट दिली अन ड्रॅगन फ्रूटची नवीन वाण केली विकसित
व्हिएतनामहून आल्यानंतर श्रीनिवास यांनी तैवान, मलेशियासह 13 देशांना भेटी दिल्या. तिथे ड्रॅगन फ्रुटची माहिती मिळाली. त्यानंतर भारतात येऊन त्यांनी ड्रॅगन फ्रूटचे वाण त्यांच्या नावावर तयार केले. जे भारतातील हवामानानुसार कुठेही पिकवता येते.
2016 च्या शेवटी त्यांनी ड्रॅगन फ्रूटची 1000 रोपे लावली. ते स्वतः रोज शेतावर जाऊन रोपाची काळजी घेत, त्यांना औषध देत असत. यामुळे त्याना पहिल्याच वर्षी चांगल उत्पादन झाले.
आज डॉ.श्रीनिवास यांच्याकडे 12 एकर जमिनीवर ड्रॅगन फ्रूटची बाग आहे. या 12 एकरात सुमारे 30,000 झाडे आहेत. यातून 80 टन पर्यंत उत्पादन सध्या त्यांना मिळतं आहे.
श्रीनिवास म्हणतात की, एक एकर जमिनीवर लागवड केल्यास 10 टन फळे येतात आणि यातून प्रतिटन 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळतते. निश्चितच डॉक्टर श्रीनिवास यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे.