शेती (Farming) हा बारामाही केला जाणारा आणि जोडबळाने केला जाणारा व्यवसाय आहे. एकटा माणूस शेती करू शकतो मात्र शेतीत चांगले यश (Success) संपादन करू शकत नाही.
याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते (Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यातून. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या मौजे सांगवे येथील शेलार कुटुंबातील सात भावानी शेतीमध्ये एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. या सात शेलार बंधूनी आपापसात सामंजस्य,समन्वय, आपलेपणा आणि विश्वास असला तर काय केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.
मौजे सांगवे येथील शेलार कुटुंबात एकूण सात भाऊ आहेत. यामध्ये सख्खे तीन आणि सख्खे चुलत चार भाऊ आहेत. या सातपैकी मिलिंद गावाकडेच शेती बघण्यासाठी वास्तव्यास आहेत.
मिलिंद वगळता बाकी सर्व भाऊ नोकरीनिमित्ताने मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र शेतीशी त्यांची देखील नाळ अजूनही घट्ट आहे. सुट्ट्यांमध्ये गावी आल्यावर शेती व्यवसायात (Farming Business) सर्व भाऊ एकत्र मिळून काम करतात.
अशी झाली शेतीची भन्नाट सुरवात
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2010 मध्ये सणानिमित्त शेलार बंधू गावी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी शेतीविषयक सखोल चर्चा केली आणि घरची फळबागायत प्रगत करण्यासाठी एक मत बनले.
मग शेलार बंधूनी केळीची शेती करण्याचे नियोजन आखले. या अनुषंगाने दोन भावांनी माहितीची शोधाशोध सुरू केली. यादरम्यान चिपळूणच्या एका केळी बागेची पाहणी केली.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचे मार्गदर्शन घेतले. विशेष म्हणजे केळी शेती साठी येणारा सर्व खर्च मुंबईतील भावांनी उचलण्याचे ठरवले. मात्र गावाकडे राहणाऱ्या मिलिंद यांच्याकडे पूर्णपणे शेतीची जबाबदारी सोपवली गेली.
सात भाऊंनी आपापसात विचार विनिमय करून केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमधून केळीची रोपे आणली. केळीच्या लागवडीसाठी सुरवातीस दहा लाख रुपये गुंतवणूक करावी लागली. यामध्ये रोपांसाठी त्यांना तीन लाखांचा खर्च आला.
शेतीकामासाठी मुंबईहुन पलटण शेतात होते दाखल
मिलिंद शेतीची सर्व जबाबदारी पार पाडत असले तरीदेखील पिकांची काढणी असली तर मुंबईहून सहा भावांची पलटण मिलिंद यांच्या मदतीसाठी धावून येत असते.
सणासुदीच्या दिवशी गावी आल्यावर शेती मधील सर्व कामे केली जातात. शेतीतली कामे वाढली तर गावाकडील मुक्काम देखील वाढवला जातो.
यामुळे मजुरीवरील खर्च वाचतो शिवाय आपापसात जिव्हाळा देखील उत्पन्न होतो. शेलार कुटुंबीयांनी शेतीमध्ये दोन शेतमजूर देखील कामासाठी ठेवले आहेत.
सर्व निर्णय एकत्रित घेतात
शेलार कुटुंब शेती मधील सर्व निर्णय आपापसात एक मताने देत असतात यामुळे परिवारात होत असलेला वाद देखील टाळता येतो. अनेकदा मोबाईल वरून देखील निर्णय घेतले जातात.
केळीची शेती करण्याचे ठरवले त्यासाठी केळी पिकाला आवश्यक पाण्याचे नियोजन कसे करायचे याविषयी सात भावांनी चर्चा केली.
ठिबक सिंचन प्रणालीचे यशस्वी व्यवस्थापन केले. जवळच दीड किलोमीटरवर असणाऱ्या सप्तलिंगी नदीतून पाईपलाईन करण्याचे ठरवले. यासाठी येणारा खर्च सर्व भावांनी उचलला.
वन्य प्राण्यांचा उपद्रव
शेलार कुटुंबीयांच्या शेतालगत जंगलक्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा अधिक उपद्रव भासू लागला. यामध्ये गवारेड्यांचा अधिक त्रास केळीच्या शेतीसाठी सुरु झाला.
यामुळे त्यांना केळीचे क्षेत्र कमी करावे लागले. मग अननस आणि कलिंगड या पिकांचे पर्याय मिळाले. याशिवाय सात एकर क्षेत्रासाठी तीन लाख रुपये खर्च करून लोखंडी तारांचे कुंपण घातले. यासाठी मिलिंद यांनी कठोर मेहनत घेतली यामुळे मजुरीवर होणारा मोठा खर्च टाळणे शक्य झाले.
शेती ही एकट्यादुकट्याची नाही
शेलार कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे की, शेती ही एकट्यादुकट्याची नसून यासाठी जोडबळ आवश्यक आहे. शेतीमध्ये या सात भाऊनी केलेली कामगिरी एकत्रित कुटुंब पद्धतीला अधोरेखित करणारी आहे. यामुळे निश्चितच शेलार कुटुंबीय इतर शेतकरी कुटुंबांसाठी आदर्शवत ठरणारे आहेत.