ST Ticket Fare Hike : महाराष्ट्रात लाल परीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. रेल्वेनंतर आपल्या राज्यात सर्वाधिक लाल परीने म्हणजेच एसटीने प्रवास केला जातो.
सणासुदीच्या काळात एसटी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. येत्या सहा दिवसात सुरू होणाऱ्या दिवाळीच्या सणाला देखील एसटी प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या काळातच एसटी प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महागणार असे वृत्त समोर आले आहे. एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळीत हंगामी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे लाल परीचा प्रवास दिवाळीत महागणार असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महागाईने आधीच पिचलेल्या सर्वसामान्य जनतेला आता एसटी महामंडळाने देखील जोर का झटका दिला आहे.
किती वाढणार तिकीट दर ?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बस तिकीट दर दिवाळीच्या काळात 10 टक्क्यांनी वाढवले जाणार आहेत.
दरम्यान ही तिकीट दर वाढ हंगामी राहणार आहे. म्हणजेच फक्त दिवाळीच्या काळासाठीच ही तिकीट दर वाढ लागू केली जाईल आणि यानंतर पुन्हा एकदा तिकीट दर पूर्ववत केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
केव्हापासून लागू होणार नवीन निर्णय ?
हंगामी तिकीट दरवाढीचा नवीन निर्णय 7 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून लागू केला जाणार असल्याचे एस टी महामंडळाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. सात नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून अर्थातच आठ नोव्हेंबर पासून हा नवीन निर्णय लागू होईल.
हा निर्णय 27 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहे. अर्थातच 8 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 टक्के अधिक तिकीट दरात प्रवास करावा लागणार आहे.
ज्या प्रवाशांनी या कालावधीत प्रवासासाठी आरक्षण केले आहे त्यांना तिकीट दराची उर्वरित रक्कम कंडक्टरकडे अर्थातच वाहकाकडे भरावी लागणार आहे.