Soybean Variety : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाची लागवड राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवड केली जाते.
मात्र या विभागात होणारी लागवड ही खूपच मोजकी आहे. तथापि राज्यातील विदर्भ, मराठवाडा या विभागात सोयाबीनची विक्रमी लागवड होत असून देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो.
देशातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. यावरून सोयाबीन पिकावर राज्यातील शेतकऱ्यांचे अवलंबित्व स्पष्ट होते. दरम्यान येत्या काही दिवसात सोयाबीन पीक पेरणीला सुरुवात होणार आहे.
अशातच यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे अलीकडेच विकसित झालेले सोयाबीनच्या एका नवीन जातीचे बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
दफ्तरी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकसित केलेले दफ्तरी 354 हे सोयाबीन वाण बाजारात उपलब्ध होणार आहे. दरम्यान आज आपण या जातीच्या विशेषता थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दफ्तरी 354 जातीच्या विशेषता
सोयाबीनचे हे अलीकडेच विकसित झालेले वाण मध्यम कालावधीत परिपक्व होत असल्याची माहिती कंपनीकडून प्राप्त झाली आहे. सोयाबीनचे हे वाण 95 ते 105 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते.
या जातीची पेरणी करायची असेल तर दोन ओळींमधील अंतर 16 ते 18 इंचा पेक्षा जास्त नसावे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये तणाचा प्रादुर्भाव होत नाही.
या जातीच्या सोयाबीनला तीन ते चार दाण्यांच्या शेंगा मोठ्या प्रमाणात लागतात. विषाणूजन्य रोगांसाठी ही जात प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. शेंगा पक्व होऊन दाणे गळत नाहीत यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे.