Soybean Variety : महाराष्ट्रात येत्या काही दिवसात सोयाबीन आणि कापूस पेरणीला सुरुवात होणार आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागत अन बी बियाणे खरेदीसाठी लगबग करत आहेत.
खरे तर यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे. यामुळे साहजिकच खरीप हंगामातील पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र देखील यंदा वाढेल असा विश्वास तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण सोयाबीनच्या लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या काही जातींची माहिती पाहणार आहोत.
सोयाबीनच्या लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या जाती
जे एस 9560 – सोयाबीनची ही एक लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होणारी जात आहे. ही जात पेरणीनंतर 82 ते 88 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते.
चार दाण्यांच्या शेंगा असणारे हे वाण शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत देखील यापासून चांगले उत्पादन मिळते.
एमएयूएस ७३१ – सोयाबीनची ही अलीकडेच विकसित झालेली एक प्रमुख जात आहे. या जातीची मराठवाडा विभागासाठी शिफारस करण्यात आली आहे. हे सोयाबीनचे एक लवकर परिपक्व होणारे वाण आहे.
या जातीपासून 28 ते 32 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. विविध कीड व रोगास ही जात मध्यम प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे.
जे एस 9305 – सोयाबीनची ही एक प्रमुख जात आहे. राज्यातील हवामान या जातीस विशेष अनुकूल आहे. 2002 मध्ये ही जात प्रसारित करण्यात आली आहे. पेरणीनंतर 85 ते 90 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते.
म्हणजेच हे एक लवकर येणारे वाण आहे. हलक्या व मध्यम जमिनीत या जातीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. या जातीपासून हेक्टरी 20 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.