Soybean Variety For Maharashtra : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस होता तरीदेखील सोयाबीनची लागवड विशेष उल्लेखनीय होती.
यंदा तर भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. 2024 च्या मान्सून मध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र थोडेसे वाढू शकते असा अंदाज आहे.
सोयाबीन हे प्रमुख तेलबिया पीक असून याच्या उत्पादनाचा विचार केला असता मध्य प्रदेश हे देशात पहिल्या क्रमांकावर येते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी मध्य प्रदेश राज्यात 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते आणि आपल्या राज्यात 40 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते.
सोयाबीनची लागवड ही राज्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तथा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाहायला मिळते. पण विदर्भ अन मराठवाडा हे दोन विभाग सोयाबीन उत्पादनासाठी विशेष ख्यातनाम आहेत.
खरेतर सोयाबीनच्या विविध जाती वेगवेगळ्या राज्यात पेरल्या जातात ज्यामुळे चांगले उत्पादन घेता येते. कृषी शास्त्रज्ञ वेगवेगळ्या राज्यांसाठी सोयाबीनच्या विविध जातींची शिफारस करतात. दरम्यान आज आपण महाराष्ट्रासाठी शिफारशीत सोयाबीनच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रासाठी शिफारसीत सोयाबीनच्या जाती
सोयाबीन JS 2034 :- भारतातील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाने सोयाबीनची ही जात विकसित केली आहे. ही अतिशय लवकर परिपक्व होणारी सुधारित सोयाबीनची जात म्हणून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. जे.एस. 2034 हा वाण मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासाठी शिफारशीत आहे.
सोयाबीन जेएस 2098 :- जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ, मध्य प्रदेशने सोयाबीनच्या जुन्या वाणांना चांगला पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या लक्षात घेऊन सतत सखोल संशोधन केल्यानंतर सोयाबीनचे हे सुधारित वाण तयार केले आहे.
जेएस 2098 या जातीची देशातील अनेक प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये लागवड पाहायला मिळते. सोयाबीनच्या या जातीची मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बुंदेलखंड, मराठवाडा आणि विदर्भात पेरणीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
सोयाबीन RVS-18 (प्रज्ञा) :- राजमाता सिंधिया कृषी विद्यापीठाने अलीकडेच सोयाबीनचा हा वाण विकसित केला आहे. सोयाबीनचा हा वाण उच्च उत्पादनासाठी ओळखला जातो. सोयाबीनची ही नवीनतम जात देशाच्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बुंदेलखंड, मराठवाडा, विदर्भ इत्यादींसाठी जारी करण्यात आली आहे.