Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष सुरू होण्याआधीच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीनचे बाजार भाव आज थोडे वाढलेत. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही नवीन वर्षाची एक मोठी भेट समजली जात आहे. सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे पीक मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. या तेलबिया पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नाहीये. यंदा तर सोयाबीनला गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी दर मिळत आहे. यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत आले असून पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढावा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
अशातच मात्र आज विदर्भातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती मधून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाशिम एपीएमसी मध्ये सोयाबीनचे दर पाच हजार रुपयाच्या पुढे गेले आहेत.
राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वासिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 4500 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली.
या मालाला बाजारात किमान 3860 कमाल 5270 आणि सरासरी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. राज्यातील इतर बाजारांमध्ये मात्र सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नाही.
सोयाबीनचे कमाल दर राज्यातील अनेक बाजारांमध्ये साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी नमूद करण्यात आले आहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळाला. या बाजारात आज सोयाबीनला कमाल 4310 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
तसेच किमान 3805 आणि सरासरी ४०५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. वासिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर प्रथमच पाच हजाराच्या पुढे गेले असल्याने आगामी काळात भाव वाढ होऊ शकते अशी आशा आता पल्लवीत झाली आहे.