Soybean Farming : तुम्हीही यंदा सोयाबीन लागवड करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की, आज आपण जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या कोणत्या वाणाची पेरणी केली पाहिजे ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडा
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी त्यांच्या जमिनीच्या मगदूरानुसार सोयाबीन वाणाची निवड केली पाहिजे. जर हलकी जमीन असेल तर 85 ते 95 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाची निवड केली पाहिजे. तसेच मध्यम प्रकारातील जमीन असेल तर शेतकऱ्यांनी 95 ते 100 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या वाणाची निवड केली पाहिजे.
हलकी ते मध्यम जमीन असल्यास जे.एस.-९३०५, पी.के.व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस-१००३९), एम.ए.यु.एस.-७२५, एम.ए.सी.एस.-१४६० आर.व्ही.एस.एम.-१८, एम.ए.यु.एस-१५८, एम. ए.यु.एस.-६१२,जे.एस.-३३५ या सोयाबीनच्या जातींची निवड करायला काही हरकत नाही.
तसेच कृषी तज्ञांनी ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन असेल त्यांनी मध्यम ते उशिरा येणारे वाण निवडावे असे म्हटले आहे. भारी जमिनीसाठी शेतकरी बांधव फुले किमया, फुले संगम, फुले दुर्वा, एम. ए.यु.एस-७१, एम. ए.यु.एस- ६१२, फुले कल्याणी, तसेच पी.के.व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस -१००३९) या सोयाबीन जातींची निवड करू शकतात.
मात्र भारी जमीन असेल आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता असेल तेव्हाच उशिरा येणाऱ्या वाणाची निवड करावी. जर भारी जमीन असेल आणि पाण्याची सोय नसेल तर मध्यम कालावधीत हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या वाणाची निवड करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
तसेच शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्वच क्षेत्रावर फक्त एका प्रकारचे वाण लावणे टाळावे. म्हणजेच पाच एकर क्षेत्र असेल तर त्यापैकी काही क्षेत्रावर वेगळ्या जातीची आणि काही क्षेत्रावर वेगळ्या जातीची लागवड करावी.
जेणेकरून शेतकऱ्यांना एका जातीपासून चांगले उत्पादन मिळाले नाही तर दुसऱ्या जातीपासून चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीच्या मगदूराप्रमाणे तुमच्या क्षेत्रात दोन-तीन प्रकारच्या जातींची लागवड केल्यास तुम्हाला निश्चितच चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकणार आहे.