Soybean Farming : जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण विक्रमी उत्पादनासाठी पहिली फवारणी कोणत्या औषधांची घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे.
याची लागवड राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. याशिवाय खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सोयाबीन पीक उत्पादित केले जाते. हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे.
याला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे. या पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येते. यासाठी मात्र पीक व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
यासाठी सोयाबीन लागवडीनंतर चक्रीभुंगा आणि इतर अळीच्या नियंत्रणासाठी आणि फुटव्यांची संख्या वाढावी यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिकची एकत्रित फवारणी केली पाहिजे.
सोयाबीनची पहिली फवारणी कधी करावी
राज्यातील बहुतांशी भागात सोयाबीन पेरणी झाली आहे. यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात वेळेआधीच आगमन झाले होते आणि यामुळे राज्यातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या शेतकरी बांधव सोयाबीन साठी पहिली फवारणीची तयारी करत आहेत.
कृषी तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन जवळपास एक महिन्याचे झाले असेल त्यांनी पहिली फवारणी करायला हरकत नाही. सोयाबीन साठी पहिली फवारणी 25 ते 30 दिवसांनी केली गेली पाहिजे. या काळात पहिली फवारणी केल्यास चांगले उत्पादन मिळते.
पहिली फवारणी कोणत्या औषधांची करावी?
पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून लैम्ब्डा-सायलोथ्रिन (95-TC) आणि थायोमेथोक्साम हे घटक असणाऱ्या औषधाची निवड करावी. सिजेंटा कंपनीचे अलिका या कीटकनाशक मध्ये हे घटक आढळतात.
हे कीटकनाशक प्रति पंप 10 मिली या प्रमाणात घेतले पाहिजे. यासोबतच तुम्ही या फवारणीत बुरशीनाशक म्हणून साप पावडर किंवा M-45 यापैकी एक बुरशीनाशक वापरू शकता. याचे प्रमाण 40ml प्रति पंप एवढे ठेवावे.
तसेच या पहिल्या फवारणी तुम्ही टॉनिक म्हणून बायोविटाएक्स हे टॉनिक वापरू शकता. याचे प्रमाण 40 ml प्रति पंप इतके असावे. म्हणजे पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी पहिल्या फवारणीत एक कीटकनाशक + एक बुरशीनाशक + एक टॉनिक घेतले पाहिजे.