Soybean Farming : भारतीय हवामान विभागाने यावर्षी 31 मे ला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज दिला आहे. तसेच काही हवामान तज्ञांनी यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात अर्थातचं तळ कोकणात वेळेत आगमन होणार असे म्हटले आहे. यंदा तळ कोकणात मान्सूनचे सात जूनच्या सुमारास आगमन होऊ शकते असा अंदाज आहे.
एकंदरीत येत्या काही दिवसात मान्सूनचे आपल्या महाराष्ट्रात आगमन होणार असून मान्सून आगमनानंतर खरीप हंगामातील पीक पेरणीला वेग येणार आहे. आपल्या राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
सोयाबीन बाबत बोलायचं झालं तर हे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे.
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज असल्याने सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र यावर्षी वाढू शकते असे म्हटले जात आहे.
तथापि सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या दोन प्रमुख जातींची माहिती पाहणार आहोत.
सोयाबीनचे प्रमुख वाण
एन.आर.सी. ३७ : सोयाबीनचा हा एक सुधारित वाण असून देशातील अनेक प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळते. अहिल्या -४ या नावाने ही जात ओळखले जाते. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये ही जात प्रसारित करण्यात आली आहे.
भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर या संस्थेने सोयाबीनची ही जात विकसित केली आहे. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल असल्याचे आढळले आहे. ही सर्वाधिक उत्पादन देणारी सोयाबीनची जात शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
या जातीची मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांत मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. हे सोयाबीनचे ९६ ते १०२ दिवसांत परिपक्व होणारे वाण आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी तज्ञांनी केलेला आहे.
एन.आर.सी. १३८ : सोयाबीनची ही अलीकडेच विकसित झालेली एक प्रमुख जात आहे. २०२१ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर या संस्थेने सोयाबीनची ही जात विकसित केली आहे. इंदोर सोया १३८ या नावाने सोयाबीनचा हा सुधारित प्रकार ओळखला जात आहे.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तांबेरा आणि पिवळा मोझॅक रोगास प्रतिकारक्षम आहे. विशेष बाब अशी की अवघ्या तीन महिन्यात म्हणजेच 90 ते 94 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असते. तसेच या जातीपासून 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत आहे.