Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळते. पण, गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. अक्षरशः पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याची वास्तविकता आहे.
मात्र असे असले तरी यावर्षी मानसून काळात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा अर्थातच 2024 च्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढू शकते असे म्हटले जात आहे. सोयाबीन पिकातून हेक्टरी 20 ते 25 क्विंटल एवढे उत्पादन मिळत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र प्रत्यक्षात राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 10 ते 12 क्विंटल एवढेच उत्पादन मिळत आहे.
म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित एकरी उतारा मिळतं नाहीये. यामागे अनेक कारणे कारणीभूत आहेत. यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे सोयाबीन पिकाची योग्य वेळेत पेरणी न होणे.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनची पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळवता येईल या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनची पेरणी कधी केली पाहिजे?
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन या प्रमुख तेलबिया पिकाची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत केली पाहिजे.
पण जेव्हा ७५ ते १०० मि. मी.पाऊस होईल तेव्हाच याची पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करुनच याची पेरणी करावी, असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.
बीजप्रक्रिया करणे आवश्यक
कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर बियाण्यावर बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. सोयाबीन या प्रमुख तेलबिया पिकाच्या बाबतीत देखील असेच आहे.
याची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशकाची प्रक्रिया करुन बियाणे सावलीमध्ये वाळवून योग्य वेळी पेरणी करावी असा सल्ला दिला जात आहे.
योग्य जातींची निवड करणे आवश्यक
सोयाबीन पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला दिला जातोय. शेतकरी बांधव फुले किमया, फुले संगम, जे एस ३३५, जेएस ९३०५, एमएयुएस ७१, एमएयुएस ६१२ इ. सोयाबीनच्या प्रमुख जातींची निवड करू शकतात.