Soybean Farming : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील बहुतांशी भागात प्रामुख्याने हवामान कोरडे आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे आणि किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
जोरदार पाऊस मात्र गायबच झाला आहे. यामुळे पिकाला पाण्याचा ताण बसत आहे. अशातच हवामान विभागाने जवळपास सात सप्टेंबर पर्यंत राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
अशा परिस्थितीत कृषी तज्ञांनी राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सोयाबीन पिकाला दहा दिवसांपेक्षा अधिक काळ पाण्याचा ताण बसत असेल तर शेतकऱ्यांना एका औषधाची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त सध्या मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन पिकावर काही किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील कृषी तज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.
सोयाबीन पिकासाठी हे काम करा
जर दहा दिवसांपेक्षा अधिक काळ पाण्याचा ताण पडला असेल तर सोयाबीन पिकाला 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी शेतकऱ्यांनी करावी असा सल्ला देण्यात आला आहे. ज्वारी, बाजरी, ऊस व हळद या पिकासाठी देखील ही फवारणी केली पाहिजे असेही कृषी तज्ञांनी यावेळी नमूद केले आहे.
याशिवाय सोयाबीन पिकाचे पाने पावसाअभावी सूकत असतील तर तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या राज्यातील काही भागात पावसाची उघडीप आहे आणि मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. यामुळे पिकावर किडींचा प्रादुर्भाव होत आहे.
यामुळे जर सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला यावेळी कृषी तज्ञांनी दिला आहे. शेतकरी मित्रांनो, कुठल्याही औषधाची फवारणी करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा किंवा कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला घेणे मात्र आवश्यक राहणार आहे.