Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तथा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये केली जात आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाडा हे दोन विभाग सोयाबीन उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. या ठिकाणी सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक म्हणून उत्पादित केले जात आहे.
येथील बहुतांश शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. दरवर्षी महाराष्ट्रात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. यंदा देखील आपल्या राज्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाणार अशी आशा आहे.
गेल्या वर्षी कमी पाऊस असतानाही अनेकांनी सोयाबीन लागवड केली होती. यंदा तर मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे. यामुळे साहजिकच सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र यंदा वाढेल असे म्हटले जात आहे.
तथापि, आज आपण सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर पेरणीच्या वेळी कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीन पिकासाठी कस असाव खत व्यवस्थापन ?
सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. हे शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. पण यातून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर केला पाहिजे.
हेक्टरी २० गाड्या शेणखत म्हणजे अंदाजे १० टन शेणखताचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पेरणीच्या वेळी रासायनिक खतांचा देखील वापर करावा लागणार आहे.
सोयाबीन पेरणी करताना ५० किलो नत्र + ७५ किलो स्फूरद + ४५ किलो पालाश + २० किलो गंधक प्रति हेक्टर या प्रमाणात वापरले गेले पाहिजे. पण जर तुम्ही स्फूरदसाठी सिंगल सुपर फॉसपेट या खताचा वापर केला तर तुम्हाला अतिरिक्त सल्फर अर्थातच गंधक वापरण्याची गरज नाही.
कारण की सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये गंधक ऑलरेडी असते. पण जर तुम्ही सल्फर नसलेले खत म्हणजेच गंधकरहित खतांचा जसे की, १८:१८:१०,१२:३२:१६,१०:२६:२६ डीएपी ई. खतांचा वापर केला तर गंधक २० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात दिले पाहिजे.
सोयाबीनच्या जोमदार वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी गंधकची आवश्यकता असते. यामुळे गंधकचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच या रासायनिक खताबरोबर हेक्टरी १५ किलो फोरेट वापरल्यास सोयाबीनवरील खोडमाशी व चक्री भुंग्याचे सारख्या किडीवर नियंत्रण मिळवता येते.
पण ही सर्व खते पेरणीच्या वेळेस दिली पाहिजे. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर माती परिक्षण अहवालानुसार करावा. पण, सोयाबीन पिकाला खत देताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.