Soybean Farming : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरे तर शेतकरी बांधव सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखतात. याची लागवड राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. मात्र महाराष्ट्रात याची सर्वाधिक लागवड विदर्भ आणि मराठवाडा या विभागातच होते.
महाराष्ट्राबरोबरच सोयाबीनची लागवड मध्यप्रदेश या राज्यातही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी मध्य प्रदेश या राज्यात 45% एवढे उत्पादन घेतले जाते दुसरीकडे महाराष्ट्रात देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के एवढे उत्पादन घेतले जात आहे.
म्हणजेच उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश राज्याचा पहिला नंबर आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. यावरून राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे हे आपल्याला समजते.
हेच कारण आहे की कृषी संशोधकांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सोयाबीनचे नवीन वाण विकसित केले आहे. NRC 188 ही सोयाबीनची अलीकडे विकसित झालेली एक प्रमुख जात आहे. या जातीच्या सोयाबीन पासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे.
सोयाबीनची ही जात दुर्गंधीमुक्त आहे. हे सोयाबीन वाटाणा प्रमाणे वापरले जाऊ शकते, म्हणजे जसे वाटाण्याच्या शेंगा हिरव्या शेंगा म्हणून खाण्यासाठी वापरल्या जातात, त्याचप्रमाणे एनआरसी – 188 सोयाबीन जातीच्या शेंगा देखील वापरल्या जाऊ शकतात. सोयाबीनच्या या जातीच्या दाण्यांची चव वाटाण्यासारखीच आहे.
या जातीच्या सोयाबीनच्या शेंगाचा वापर भाजी बनवण्यासाठी सुद्धा होतो. या सोयाबीन जातीपासून हिरव्या शेंगांचे हेक्टरी तरी 40 ते 45 क्विंटल एवढे उत्पादन मिळते. यातून शेंगांचे उत्पादन घेतले जाऊ शकते किंवा सोयाबीन दाण्याचे देखील उत्पादन मिळू शकते.
हिरव्या शेंगांचे उत्पादन घ्यायचे असेल तर यातून 75 दिवसांनी उत्पादन मिळू शकते. एकंदरीत सोयाबीनची ही जात दुहेरी उत्पादनासाठी वापरली जाऊ शकते आणि यामुळे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोयाबीनची ही नव्याने विकसित जात भारतीय कृषी संशोधन केंद्र, इंदूरने विकसित केलेली आहे.
सोयाबीनची ही जात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशासाठी अधिसूचित करण्यात आली आहे. म्हणजे या संबंधित भागातील शेतकरी बांधव या जातीच्या सोयाबीनची पेरणी करू शकतात.