Soybean Crop Management : पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला आहे. आता राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. यामुळे खरिपातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.
पावसाअभावी ज्या पिकांची वाढ खुंटली होती आता त्या पिकांची जोमदार वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीन हे देखील खरीप हंगामातील एक मुख्य पीक असून गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या पिकाच्या वाढीसाठी देखील पोषक हवामान तयार होणार असा अंदाज आहे.
मात्र असे असले तरी काही भागात सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. खरंतर, हा रोग पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे अधिक वेगाने पसरतो. पांढरी माशीमुळेच हा रोग सोयाबीन पिकावर येतो. अशा परिस्थितीत या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पांढरी माशीवर नियंत्रण मिळवणे जरुरीचे आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण सोयाबीन पिकावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
पांढरी माशी कीटक नियंत्रणात ठेवण्यासाठी हे काम करा
रोग प्रतिरोधक वाणाचीच पेरणी करा.
शेतात ड्रेनेजची सोय असावी म्हणजे पावसाचे पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी.
आपल्या शेजाऱ्यांचा सल्ला घ्या आणि एकाच वेळी सोयाबीन पेरणी करा. फार लवकर किंवा फार उशीरा पेरणी करू नका. सोयाबीन पेरणी ही साधारणतः 15 जून ते 15 जुलै दरम्यान केली जाते. या कालावधीपेक्षा आधी किंवा नंतर सोयाबीन पेरणी करणे टाळावे.
सोयाबीनची दाट पेरणी करा. जास्त दाट किंवा खूपच पातळही पेरणी करू नका. योग्य अंतरावर पेरणी केल्यास उत्पादन चांगले मिळते तसेच रोगराई कमी येते.
प्रति एकर 20 पिवळे चिकट सापळे बसवा.
ब्रॉड-स्पेक्ट्रम कीटकनाशके वापरू नका. अंडी किंवा अळ्या असलेली पाने काढून टाका.
कापणीनंतर शेतातील वनस्पतींचे अवशेष काढून टाका. उन्हाळ्यात थोड्या काळासाठी शेत पडीक राहू द्या.
पांढरी माशीवर रासायनिक नियंत्रण कसे मिळणार ?
संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, पिवळी पडलेली पाने तोडून टाका आणि गाईच्या गौवरीच्या राखेची डस्टिंग करा.
थायोमेथॅक्सम 25 w g. कीटकांचा प्रादुर्भावाच्या प्रमाणानुसार 80 ते 100 ग्रॅम प्रती हेक्टर या प्रमाणात घेऊन फवारणी करा.
किंवा बीटासिफ्लुथ्रीन ४९ + इमिडाक्लोप्रिड १९.८१% ओ.डी. 350 मिली प्रति हेक्टर या प्रमाणात घेऊन फवारणी केल्यास ही कीड झाडावर येण्यापासून रोखता येते.
125 मिली प्रिमिक्स्ड थायो मेथॉक्सम + लॅम्बडासीहॅलोथ्रिन प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करा. यामुळे पांढऱ्या माशीवर तसेच पाने खाणाऱ्या कीटकांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.