सोयाबीन लागवड केलीय ? मग ‘हे’ एक काम कराच, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop Management : सोयाबीन महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन हे पीक खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात उत्पादित होते.

पण उन्हाळी हंगामात लावले जाणारे सोयाबीन हे प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी लावले जातात. म्हणजे व्यापारी तत्त्वावर याची लागवड खरीपातच होते. दरम्यान याही वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केली आहे. यंदा मात्र सोयाबीन पिकाला पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे.

गेली अनेक दिवस पावसाने खंड दिला असल्याने सोयाबीन पीक संकटात आले आहे. आता राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे कदाचित सोयाबीन पिकाला चांगला आधार मिळणार असे बोलले जात आहे. खरंतर सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागातील सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे.

पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने अनेक भागात सोयाबीन पेरणी उशिराने झाली होती अशा भागात सध्या सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. तर काही भागात सोयाबीन पिकाला शेंगा लागत आहे. तर काही ठिकाणी पापडी अवस्थेत असलेल्या शेंगांमध्ये दाणे भरले जात आहेत.

अर्थातच सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागात सोयाबीन पीक वेगवेगळ्या अवस्थेत आहे. मात्र या अवस्थेतील सोयाबीन पिकावर कीटकाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे सध्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

चक्रीभुंगा या खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला तर सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. या कीटकाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या झाडाची सुरुवातीच्या टप्प्यात एखादी फांदी सुकते. यानंतर मात्र हळूहळू संपूर्ण झाड सुकते.

यामुळे या कीटकावर वेळीच नियंत्रण मिळवणे जरुरीचे आहे. दरम्यान आज आपण चक्रीभुंगा, शेंगा पोखरणारी आळी, केसाळ अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी या कीटकाच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीभुंगा, शेंगा पोखरणारी आळी, केसाळ अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी या सर्व किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% – ६० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) – ५० मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९० % १७० मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३ % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.६ % – ८० मिली (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८% १०० ते १२० मिली किंवा बिटा – सायफ्ल्युथ्रीन ८.४९ % + इमिडाक्लोप्रीड १९.८१ % (पूर्वमिश्रित कीटकनाशक) – १४० मिली किंवा असिटामाप्रीड २५ % + बाइफेन्थ्रीन २५%-१०० ग्रॅम या कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे.

येथे दिलेले प्रमाण हे प्रति एकर साठी आहे. त्यामुळे फवारणी घेताना या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच फवारणी अगोदर कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा किंवा कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे जरुरीचे राहणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा