Soyabean Rate : देशाच्या एकूण सोयातील उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 45 टक्के सोयाबीन उत्पादन मध्य प्रदेश या राज्यात होते आणि 40% सोयाबीन उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते.
अर्थातच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 85 टक्के एवढे विक्रमी उत्पादन घेतले जाते. यावरून आपल्या लक्षात येतेच की, राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण सोयाबीन पिकावर अवलंबून आहे.
सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही तुरळक भागात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे पीक शेतकऱ्यांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरू लागले आहे.
याचे कारण म्हणजे सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नाही. चालू हंगामात तर अगदी विजयादशमीपासून म्हणजेच हंगाम सुरू होण्यापासूनच बाजार दबावात आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळत होता.
मात्र तदनंतर बाजारभावात घसरल झाली आणि सोयाबीनचे भाव साडे चार हजार रुपयापर्यंत खाली आलेत. विशेष म्हणजे काही बाजारात तर सोयाबीनचे भाव 4200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अशातच, मात्र सोयाबीन उत्पादकांसाठी भाव वाढीचा एक आशेचा किरण दिसू लागला आहे. मागील आठवड्यापासून गोड तेलाच्या दरामध्ये प्रति किलो पाच रुपयांपासून ते बारा रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे सोयाबीनला देखील चांगला बाजार भाव मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेत गोड तेलाचे दर वाढले आहेत. याचा परिणाम म्हणून आपल्या देशातही गोड तेलाचे भाव वाढत आहेत. अशा परिस्थितीत आता भारतीय व्यापाऱ्यांना गोड तेलाची आयात करणे देखील परवडणार नाही.
हेच कारण आहे की आता सोयाबीनच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. प्रभात फार मोठी वाढ झालेली नाही परंतु 200-300 रुपयांची वाढ नमुद करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये 4307 रुपये प्रतिक्विंटल, जळकोट 4300, दिग्रस 4335, यवतमाळ 4272, राहता 4310, छत्रपती संभाजीनगर ४०२५, पुणे ४२९०, गेवराई 4325, बार्शी 4450 प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे.
अर्थातच सरासरी बाजारभाव अजूनही पाच हजार रुपयांच्या खालीच आहेत. पण, गेल्या काही दिवसांशी तुलना केली असता यामध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे काही बाजार अभ्यासकांनी पुढच्या महिन्यात सोयाबीनला 5,000 रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.
आता सोयाबीनची आवक कमी होणार आहे, दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत याचा परिणाम म्हणून आता पुढल्या महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.
परिणामी आता बाजार अभ्यासकांचा हा तरी अंदाज खरा ठरतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे. जर हंगामाच्या शेवटी का होईना सोयाबीन दरात थोडीफार सुधारणा झाली तर निदान पिकासाठी आलेला खर्च तरी भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांनी उराशी बाळगली आहे.