Solar Panel Subsidy And Loan : वाढत्या वीज बिलामुळे तुम्हीही चिंतेत आहात ना ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे वीज वितरक कंपन्यांकडून वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यामुळे तुमच्या-आमच्यासारख्यांचे आर्थिक गणित काहीसे बिघडले आहे. पण आता यावर उतारा म्हणून सोलर पॅनल कडे पहिले जात आहे.
वीज बिलापासून मुक्ती मिळवण्यासाठी आता अनेकजण सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत आहे. विशेष बाब म्हणजे सोलर पॅनल बसवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांकरीता केंद्रातील मोदी सरकारने एक विशेष योजना देखील सुरू केली आहे.
या योजनेला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना म्हणून ओळखले जात आहे. या योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024 ला झाली होती. पण, त्यावेळी या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे नाव पंतप्रधान महोदय यांनी दिले होते.
परंतु या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तेव्हा या योजनेचे नाव पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे करण्यात आले. या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. यांतर्गत एक किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
यामध्ये 1 किलोव्हॅटच्या सोलर पॅनलसाठी 30 हजार रुपये, 2 किलो वॅटच्या सोलर पॅनलसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि 10 किलोवॅटपर्यंतच्या क्षमता असलेल्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
मात्र, ग्राहकांना सोलर पॅनलसाठी अनुदान वगळता लागणारा खर्च स्वतः करावा लागणार आहे. विशेष म्हणजे आता सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना बँकेकडून कर्ज सुद्धा मिळणार आहे.
बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक सुद्धा घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
दरम्यान आता आपण बँक ऑफ इंडियाकडून सोलर पॅनल बसवण्यासाठी किती कर्ज मिळू शकते आणि यासाठी किती व्याजदर बँक आकारणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सोलर पॅनलसाठी बँक ऑफ इंडिया किती कर्ज देणार ?
बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. ही बँक आता ग्राहकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अक्षय्य ऊर्जा पर्यायांच्या वापरांना प्रोत्साहन म्हणून छतावरील सौर वीज यंत्रणेसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य देणार आहे. ग्राहकांना १२० महिन्यांच्या कमाल परतफेडीच्या कालावधीसह प्रकल्प खर्चाच्या ९५ टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा केला जाणार आहे.
किती व्याज लागणार ?
बँक ऑफ इंडिया कडून दिले जाणारे हे कर्ज प्रक्रिया शुल्काशिवाय उपलब्ध होणार आहे. यासाठी 7 टक्के व्याज दर आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेल्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ग्राहकाला यातून ७८,००० रुपयांपर्यंतच्या सरकारी अनुदानाचा फायदा सुद्धा मिळणार आहे.