Solapur News : या चालू महिन्यात महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी यादरम्यान दोन वंदे भारत ट्रेनला नरेंद्र मोदी यांनी 10 फेब्रुवारी रोजी हिरवा झेंडा दाखवला.
मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ही पुणे मार्गे धावत असल्याने या ट्रेनचा पुणेकरांना देखील मोठा फायदा होत आहे. अशातच आता पुणे आणि सोलापूर वासियांना लवकरच आणखी एक वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. वास्तविक, येत्या काही दिवसात रेल्वे विभागाच्या माध्यमातून तीन वंदे भारत ट्रेन जारी केल्या जाणार आहेत.
यापैकी एक ट्रेन ही पुण्याहून जाणार असून ही ट्रेन सोलापूर मार्गे धावणार आहे. त्यामुळे पुणे आणि सोलापूर यांना लवकरच आणखी एक वंदे भारत चा लाभ मिळणार आहे. यामुळे आज आपण नेमक्या कोणत्या रूटवर ही ट्रेन धावणार आहे आणि ही ट्रेन नेमकी केव्हा सुरू होईल याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे कडून लवकरच तीन वंदे भारत ट्रेनची सुरुवात केली जाणार आहे. या वंदे भारत ट्रेन दक्षिण रेल्वेच्या माध्यमातून सुरू होणार आहेत. यामध्ये सिकंदराबाद पुणे या ट्रेनचा देखील समावेश राहणार आहे. ही ट्रेन सिकंदराबाद ते पुणे दरम्यान असेल आणि सोलापूर मार्गे जाणार आहे. यामुळे सोलापूर आणि पुणे वासियांना हैदराबादकडील प्रवास सोयीचा होणार आहे.
निश्चितच सध्या सुरू असलेली मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन सोलापूर आणि पुणे दरम्यान प्रवासासाठी उपयुक्त आहे. या ट्रेनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय आता आणखी एक ट्रेनची सोलापूर आणि पुणेकरांना सौगात मिळणार आहे. यामुळे निश्चितच ही सोलापूर आणि पुणेवासीयांसाठी आनंदाची बाब आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सोबतच सिकंदराबाद-तिरुपती आणि सिकंदराबाद-बेंगलोर या तीन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. या ट्रेन नेमक्या कधी सुरू होतील याबाबत येत्या काही दिवसात माहिती रेल्वे विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक केली जाणार आहे. निश्चितच येत्या काही दिवसात या रेल्वेच्या उद्घाटनाच्या तारखा समोर येतील आणि तेव्हाच या ट्रेनच्या उद्घाटनाबाबत योग्य ती माहिती मिळू शकणार आहे.