सोलापूरच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग यशस्वी ! बाजरीच्या पिकाला लागले चार फुटाचे कणीस, कोणतं बियाणं वापरलं? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solapur Farmer : अलीकडे राज्यासह संपूर्ण देशभरात शेतीमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता पारंपारिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी नगदी पिकाला पसंती दाखवली आहे. यामुळे पारंपारिक पिकांचे लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

बाजरी हे देखील एक प्रमुख पारंपारिक पीक आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये मात्र या भरड धान्य पिकाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की आता भरड धान्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र शासन मैदानात उतरले आहे.

भरड धान्यांचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत असल्याने आता शेतकऱ्यांना भरड धान्य उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याचा परिणाम असा झाला आहे की जागतिक पातळीवर देखील बऱ्याच धान्याला आता मागणी वाढत आहे.

यामुळे एकीकडे पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल दाखवली जात आहे तर दुसरीकडे पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग देखील पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने केला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील मौजे कोळा येथील प्रयोगशील शेतकरी राहुल वाले या शेतकऱ्याने बाजरी पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. बाजरी पिकाच्या लागवडीत या शेतकऱ्याने नवीन आधुनिक तंत्राचा वापर केला असून या शेतकऱ्याने लावलेल्या बाजरीला तब्बल चार फूट लांबीचे कणीस लागले आहे.

यामुळे सध्या या प्रयोगाची संपूर्ण जिल्हाभर चर्चा पाहायला मिळत आहे. अनेकांनी या प्रयोगाची दखल घेतली आहे. दरम्यान आज आपण या प्रयोगशील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आतापर्यंत तुम्ही साधारण एक फूट लांबीचे बाजरीचे कणीस पाहिले असेल पण राहुल यांनी लावलेल्या बाजरीच्या पिकाला तब्बल तीन ते चार फूट लांबीचे कणीस लागले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी राहुल यांनी लावलेल्या या बाजरीला पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजस्थान येथून तुर्की जातीच्या बाजरीचे बियाणे मागवले होते.

एक हजार रुपये प्रति किलो या दरात त्यांनी बाजरीचे बियाणे मागवले. बियाणे मागवल्यानंतर त्यांनी अर्धा एकर जमिनीत म्हणजेच वीसं गुंठ्यात याची पेरणी केली. सांगोला तालुक्यातील काही भागात यंदा चांगल पर्जन्यमान पाहायला मिळाले आहे. यामुळे राहुल यांनी लागवड केलेले बाजरीचे पीक चांगले जोमात आले आहे.

विशेष म्हणजे आता राहुल यांना या बाजरीच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळणार अशी आशा आहे. पारंपारिक बाजरीच्या तुलनेत या बाजरीमधून तीन ते चार पट अधिकचे उत्पादन मिळेल असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांना या नवीन बाजरी वाणातून चांगले उत्पन्न मिळणार आहे.

एकीकडे पारंपारिक पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याची ओरड पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राहुल यांचा हा हटके प्रयोग यशस्वी झाला आहे. यामुळे त्यांना पारंपारिक पिकांमधूनही चांगली कमाई होण्याची आशा आहे. म्हणून राहुल यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील दिशा दाखवणारा ठरणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा