पुणे जिल्ह्यात वारंवार सर्पदशाच्या घटना घडून काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, नुकतेच जिल्ह्यातील सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे सर्पमित्रांनाच दंश होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच जीवदान देणाऱ्या मित्रांनाच सर्प करतोय दगाफटका अशी चर्चा मात्र सध्या पुणे शहरासह जिल्ह्यात सुरु झाली आहे. तसेच, यामुळे सर्पमित्रांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
स्वतःच्या जीवाला धोका वाटला की दंश करतात
१) सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जिवाला धोका वाटला तरच स्वरक्षणासाठी ते देश करतात. इतरवेळी ते मनुष्यापासून लांबच राहतात.
२) साप ही निसर्गाची एक सुंदर व अत्यंत उपयोगी रचना आहे. पण आपले समज, गैरसमज व भीतीमुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे. शेतकऱ्यांचाच नव्हे, तर सर्व मानवजातीचाच मित्र असलेल्या सापांना संरक्षणाची खूप गरज आहे. पण, त्यासोबतच सापापासून आपले संरक्षण व्हावे आणि सर्प दशानंतर खबरदारी घेणेही महत्त्वाचे आहे.
३) बारामती तालुक्यातील सर्पमित्र विजय यादव यांना विषारी नागाचा देश होऊन उपचारादरम्यान यादव यांचा मृत्यू झाला आहे. त्याच दरम्यान मोशी येथील सर्पमित्र नितील शेलकर याला नागाचा देश झाला होता. वन्यजीव सर्परक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष विनायक मुगडे यास विषारी नागाचा देश होऊन त्याचा मृत्यू झाला. तळेगाव ढमढेरे येथील सर्पमित्र गणेश टिळेकर यांना साप पकडताना अतिविषारी घोणस सापाचा दंश झाला होता. तर, सर्पदंश झालेल्या चौघांपैकी गणेश टिळेकर याला यापूर्वी तीनवेळा सर्पदंश झाला होता. त्यामुळे अशा सर्पमित्रांवर वन विभाग वचक ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्पमित्रांनी घ्यावयाची काळजी
■ साप विषारी की बिनविषारी याची माहिती करून घ्या.
■ पूर्ण अभ्यास असेल तरच सापाला पकडण्याचे धाडस करा.
■ साप पकडायला गेल्यावर संपूर्ण लक्ष त्या सापावर असले पाहिजे.
■ साप पकडायला जाताना नेहमी पायामध्ये बूट घालावे व सोबत प्रथमोपचार पेटी सोबत असावी.
■ प्रथम सर्पमित्रांनी आपला जीव वाचविला पाहिजे तरच साप वाचेल.
■ सापाला व इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
■ अत्याधुनिक साधनांचा वापर करून सापाला पकडण्याचा प्रयत्न करावा.
■ सापाला व्यवस्थित पकडल्यानंतर सापाचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे.
■साप पकडण्यासाठी जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये, साप पकडण्यासाठी स्टिकचा वापर करावा, पकडलेल्या सापाबाबत जनजागृती करावी, साप पकडल्यानंतर तो नागरिकांना हातळून दाखवू नये. विशेषतः साप पकडण्यासाठी जाताना गुटखा न खाता तसेच नशा न करता जावे. यामुळे सर्प पकडणाऱ्या व्यक्तीचे मन विचलित होते परिणामी दुर्घटना घडतात. – निलीमकुमार खैरे, सर्प अभ्यासक