Sleeper Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील लवकरच रुळावर धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गांवर चालवली गेली.
यानंतर, टप्प्याटप्प्याने देशातील इतरही अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी रुळावर आली आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास खऱ्या अर्थाने जलद आणि आरामदायी झाला आहे.
परिणामी वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी खूपच चांगला प्रतिसाद दाखवत आहे. सध्या आपल्या राज्यातील आठ महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, इंदोर ते नागपूर आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन देखील लवकरच रुळावर येणार असे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन उत्तर प्रदेश या राज्याला मिळणार आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर येत्या काही महिन्यांमध्ये पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होऊ शकते. ही स्लीपर ट्रेन गोरखपूर ते आग्रा या मार्गावर धावणार असा दावा केला जात आहे.
केव्हा सुरु होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन ?
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाऊ शकते. यूपीला देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळू शकते. ही ट्रेन गोरखपूर ते आग्रा दरम्यान धावणार आहे.
सुरुवातीला ही ट्रेन फक्त या दोन शहरांदरम्यान चालवली जाणार आहे, पण येत्या काळात या गाडीचा दिल्लीपर्यंत विस्तार होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
या प्रस्तावित स्लीपर वंदे भारत ट्रेनचा दिल्लीपर्यंत विस्तार झाला तर उत्तर प्रदेश राज्यातील नागरिकांना राजधानीचा प्रवास देखील जलद अन आरामात करता येणार आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेन लखनौ, ऐशबाग-कानपूर मार्गे गोरखपूर ते आग्रापर्यंत धावणार आहे. यामुळे आता देशातील ही पहिली ट्रेन केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.