शेतकऱ्यांनी ह्या वर्षी हंगामातील पीक पद्धतीत बदल करून दरवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे कडधान्य पिके घेण्यावर भर दिलेला दिसत आहे.
त्यामुळे केवळ सोयाबीनचेच क्षेत्र वाढले नाही तर वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मूगाच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात मुगाच्या क्षेत्रात सरासरी 708 हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी 1 हजार 371 एक्टर झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुबलक पाणी आणि हंगामात झालेले पिकांची नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा याबरोबरच मुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मुग पिकासाठी 5 ते 6 वेळा पाण्याची आवश्यकता असते.
वाढत्या ऊनानुसार पिकाची पाण्याची गरज वाढत जाते.तर स्प्रिंक्लरच्या माध्यमातून पाणी दिले तर कीड- रोगराईचा प्रादुर्भावही कमी होतो.काही दिवसांपूर्वी च्या ढगाळ वातावरणात मुगावर कोकडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
यामुळे उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी शेतकऱ्यांनी योग्य वेळी फवारणी करणे गरजेचे आहे. रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोग नियंत्रणासाठी अडीच ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंव एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यातून फवारावे.
उन्हाळी मुगाच्या शेंगा परिपक्व होण्यासाठी मूग 60 ते 65 दिवसात काढणीस येतो. जवळ जवळ 70 ते 75 टक्के शेंगा परिपक्व झाल्यास पहिली तोडणी करावी लागत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर टोटावार यांनी सांगितले.