Maharashtra news : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होत नसल्याने शिवसेनेने पुढच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (३ जून) वर्षा निवासस्थानी सेना नेत्यांची बैठक घेतली.
शिवसेना व तिच्या सहयोगी आमदारांबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे सर्व शिवसेना आमदारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून २०२२ रोजी मतदान होत आहे.
राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. सहा जागांसाठी ७ अर्ज कायम राहिले आहेत.
बिनविरोध निवडीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
जागा बिनविरोध करण्याबाबत चर्चा केली. मात्र भाजपला देशात राज्यसभा महत्त्वाची असल्याने त्यांनी मविआची ऑफर नाकारली. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेला पाठिंबा असलेल्या सर्व सहयोगी विधानसभा सदस्यांनी बुधवार (८ जून) ते शुक्रवार (१० जून) या कालावधीत आपल्या मतदारसंघात न राहता तातडीने मुंबईत हजर राहायचे आहे.
या सदस्यांची राहण्याची व्यवस्था नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंट येथे करण्यात आली आहे. सोमवारी (६ जून) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होणार आहे.
या बैठकीला शिवसेना व तिच्या सहयोगी सर्व विधानसभा सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर या तिघांवर या आमदारांना बंदोबस्तात ठेवण्याची जबाबदारी आहे.