Shirdi News : महाराष्ट्रात सह सध्या संपूर्ण देशभरात वंदे भारत ट्रेनच्या मोठ्या चर्चा रंगत आहेत. वेगवेगळ्या रूटवर वंदे भारत ट्रेन धावू लागल्या आहेत. देशभरात एकूण दहा वंदे भारत ट्रेन धावत असून यापैकी चार ट्रेनचा महाराष्ट्रवासीयांना लाभ होत आहे. मुंबई-गांधीनगर, नागपूर-बिलासपूर यासोबतच नव्याने मध्य रेल्वेच्या ताब्यात आलेल्या मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा या चार वंदे भारत ट्रेन सध्या स्थितीला राज्यात सुरू आहेत.
विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते गोवा दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक गतिमान होईल आणि याचा प्रवाशांना फायदा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
अशातच मात्र नव्याने सामील झालेल्या मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर बाबत प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. या वंदे भारत ट्रेनला कल्याण कासारा कर्जत या ठिकाणी थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना या ट्रेन निरुपयोगी ठरत असल्याचे मत प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर या वंदे भारत ट्रेनमुळे लोकल ट्रेनला देखील फटका बसत असून लोकलचा टाईम टेबल विस्कळीत होत असल्याचा आरोप केला जात आहे.
अशा परिस्थितीत स्थानिकांसाठी निरुपयोगी ठरणारी आणि आणि प्रवाशांचा विचार न करता सुरू करण्यात आलेल्या या वंदे भारत ट्रेन कायमस्वरूपी बंद कराव्यात असं मत कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनने व्यक्त केलं असून या असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी या वंदे भारत ट्रेन बंद करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे देशभरातून लोकप्रतिनिधींकडून आमच्या भागात वंदे भारत ट्रेन सुरू करा अशी मागणी जोर धरत असतानाच महाराष्ट्रात मात्र नव्याने ताब्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस वर प्रवाशांची नाराजी पाहायला मिळत आहे. उमेश विशे यांच्या मते, कसारा मार्गावर रेल्वे कडे वारंवार लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशा मागण्या केल्या जात आहेत.
परंतु प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे दिली जातात आणि या फेऱ्या वाढवल्या जात नाहीत. पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली गेली आणि स्थानिकांचा विचार न करता कल्याण, कासारालाच थांबा दिला नाही. अशा परिस्थितीत स्थानिक प्रवाशांसाठी ही ट्रेन सोयीची नसून यामुळे लोकलही प्रभावित होत आहे, लोकलचे वेळापत्रकही कोलमडत आहे असं त्यांनी नमूद केलं. यामुळे वंदे भारत ट्रेन बंद करावी अशी मागणी त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केली आहे.
हे पण वाचा :- मुंबई अन गोवा वासियांसाठी खुशखबर ! Mumbai-Goa वंदे भारत ट्रेन धावणार; असा राहणार रूट, केंद्र सरकारने दिली माहिती, वाचा सविस्तर