Shaktipeeth Expressway : राज्यातील मुंबई आणि नागपूर या दोन अति महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी हा महामार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित होत असून या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे हा 600 किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या समृद्धी महामार्गाने नागपूर ते भरवीर पर्यंतचा प्रवास करता येत आहे. तसेच मे 2024 पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होणार असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
दरम्यान याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तिपीठ महामार्ग विकसित केला जात आहे. आता समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला देखील गती दिली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा देवी दरम्यान हा शक्तीपीठ महामार्ग विकसित होणार आहे.
हा महामार्ग राज्यातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा राहणारा आहे. हा मार्ग मराठवाड्यातील नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील या जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान याच शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे शक्तीपीठ महामार्ग कधी होणार अशी लक्षवेधी विधिमंडळात मांडली असतांना याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे, या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश राज्य रस्ते विकास महामंडळास देण्यात आले आहेत. याचाच अर्थ आगामी काही दिवसात या महामार्गाच्या कामाला गती प्राप्त होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातून जाणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा मार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांतून जाणार आहे. पुढे मग हा मार्ग गोवा-महाराष्ट्र हद्दीला जोडला जाणार आहे. निश्चितच या मार्गामुळे वर्धा, मराठवाडा आणि कोकण या तिन्ही विभागादरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
या धार्मिक स्थळांना जोडणार
खरंतर हा महामार्ग राज्यातील सर्वच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे. राज्यातील तीन शक्तीपीठे या मार्गाने एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. हेच कारण आहे की या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग म्हणून ओळखले जाणार असल्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
या द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील माहूर (रेणुकादेवी), तुळजापूर (तुळजाभवानी माता), कोल्हापूर (महालक्ष्मी) आणि अंबाजोगाई (जि.बीड- योगेश्वरी देवी) ही प्रमुख शक्तिपीठे जोडली जाणार आहेत.
यामुळे शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी (अंबाजोगाई), औंढा नागनाथ (जि. हिंगोली) व परळी वैजनाथ (जि. बीड) येथील ज्योतिर्लिंग मंदिरे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरही या मार्गाने जोडले जाणार आहे.
शिवाय कारंजा (लाड), अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्तगुरूंची स्थळेही या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. एकंदरीत हा महामार्ग धार्मिक पर्यटनाला चालना देणार आहे. यामुळे राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या भाविकांचा प्रवास सुसाट होणार आहे.