सुमारे अकरा दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटावर विश्रांती घेत असलेला मोसमी पाऊस पुढे सरकला असला, तरी महाराष्ट्रात मोसमी पर्जन्यधारा बरसण्यासाठी किमान आठ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
यंदा बंगालच्या उपसागरात मोसमी ( मान्सून) पावसाचे आगमन विलंबाने झाले. सुमारे आठ दिवसांच्या उशिराने तेथे पोहोचलेला मोसमी पाऊस दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होईल, असा अंदाज आहे. १० जूनच्या सुमारास तो महाराष्ट्र आणि तेलंगणात बरसेल.
१५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागांत मोसमी पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरयाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल,
असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास आणि त्याची तीव्रता वाढल्यास मात्र मोसमी पावसाच्या अरबी समुद्रातील प्रगतीवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.