Satbara Utara : राज्य शासनाने सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरंतर सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड दोन्ही जमिनीचे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांवरून जमीन कोणाच्या नावावर आहे, जमिनीवर कुठला बोजा आहे का, यांसारखी सर्व माहिती मिळते. अशा परिस्थितीत हे कागदपत्रे नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.
दरम्यान या कागदपत्रांमध्ये काही चूक असल्यास ती दुरुस्त करावी लागते. खरतर जमिनीची खरेदी, बक्षीस पत्र, मृत्युपत्र, दत्तक पत्र, हक्क सोड, वारसा, बोजा नोंद इत्यादी फेरफार नोंदी कराव्या लागतात. अनेकदा या नोंदी करताना मात्र काही चुका होतात. यामुळे या चुका दुरुस्त कराव्या लागतात. जर यातील चुका दुरुस्त करण्यात आल्या नाहीत तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
मिळकतीबाबतचे वादविवाद निर्माण होतात. अशा परिस्थितीत या चुका दुरुस्त करण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1967 च्या कलम 155 अन्वये तहसीलदार अथवा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत असे. मात्र ऑफलाइन पद्धतीने हे काम करताना नागरिकांचा बहुमूल्य असा वेळ वाया जातो.
शिवाय या कामासाठी अनेक भागात नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील केली जाते. मात्र आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील या चुका दुरुस्त करण्यासाठी केला जाणारा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. यासाठी महा-ई-सेवा केंद्राद्वारे नागरिकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. ही ऑनलाईन अर्जाची सुविधा आजपासून अर्थातच एक ऑगस्ट 2023 पासून नागरिकांसाठी सुरू केली जाणार आहे.
या ऑनलाइन सुविधामुळे आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील दुरुस्ती वेळेत होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल शिवाय नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक देखील थांबणार आहे. आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कोणत्याच शासकीय कार्यालयात नागरिकांना जागे लागणार नाही.