Rice Farming : धान हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड राज्यातील विदर्भ आणि कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील काही मोजक्या भागात धानाची शेती होते. महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देखील दिला जात आहे.
धान खरीप हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. धानाच्या पिकाला मुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. दरम्यान यावर्षी मानसून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे यंदा खरीप हंगामामध्ये भात लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असा अंदाज आहे. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात धान लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
कारण की, आज आपण धानाच्या काही प्रमुख जातींची माहिती पाहणार आहोत. आज आपण बासमती तांदळाच्या टॉप तीन जातींची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कस्तुरी : बासमती तांदळाची ही एक सुधारित जात आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीची रोवणी केल्यानंतर साधारणपणे 120 ते 130 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असते. या जातीपासून हेक्टरी 30 ते 40 क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
ज्या ठिकाणी बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात लागवड होते त्या भागांमध्ये कस्तुरी बासमती तांदूळ उत्पादित होत असल्याचे पाहायला मिळते.
तरावडी : बासमती तांदळाची ही आणखी एक सुधारित जात. अनेक राज्यांमध्ये या जातीचे पीक घेतले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लागवडीनंतर सरासरी 140 ते 160 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असते.
म्हणजेच कस्तुरी बासमती तांदळापेक्षा या जातीचे पीक थोडे उशिराने पक्व होत असते. या जातीपासून एकरी 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याची माहिती तज्ञांनी दिलेली आहे.
बासमती 370 : बासमती तांदळाची ही एक निर्यातक्षम जात आहे. म्हणजेच या जातीचा तांदूळ देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात आहे. या जातीचे पीक सरासरी 140 ते 150 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होत असते.
या जातीपासून हेक्टरी 20 ते 25 क्विंटल चे उत्पादन मिळते. कस्तुरी बासमती तांदळापेक्षा या जातीचे उत्पादन थोडेसे कमी भासते मात्र या जातीच्या तांदळाला चांगला भाव मिळतो.