Ration Card Documents : आतापर्यंत रेशनकार्ड काढण्यासाठी नागरिकांना खूपच हेलपाटे मारावे लागत असत. शासकीय कार्यालयामध्ये जाऊन, एजंटाला पैसे देऊन रेशनकार्ड काढावे लागत. सर्वसामान्यांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसूल केली जात. विशेष म्हणजे रेशन कार्ड काढण्यासाठी तीन ते चार महिने लागत. एकंदरीत यात सर्वसामान्यांचा बहुमूल्य असा वेळ आणि पैसा वाया जात होता.
मात्र आता सर्वसामान्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. कारण की आता रेशन कार्ड फक्त तीस दिवसात सर्वसामान्यांना मिळणार आहे. त्यासाठी सर्वसामान्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
दरम्यान आज आपण रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कुठे केला जाऊ शकतो, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तसेच ऑनलाईन अर्ज केल्यानंतर रेशन कार्ड किती दिवसात नागरिकांना मिळू शकते याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज कुठे करावा
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची रेशन कार्ड काढण्यासाठी होणारी फसवणूक पाहता रेशन कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशन कार्ड ऑनलाइन काढता येणार आहे.
नवीन रेशन कार्ड काढण्यासोबतच दुबार किंवा विभक्त रेशनकार्ड, त्यातील नावे कमी करणे किंवा नावे वाढविणे यांसारख्या रेशन कार्ड संबंधित सुविधा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. जर आपणास नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला जवळील ऑनलाइन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन www.rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दरम्यान हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 50 ते 100 रुपये अर्ज भरण्यासाठी खर्च करावे लागतील.
किती दिवसात मिळणार रेशन कार्ड
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नवीन रेशन कार्ड फक्त 30 दिवसात संबंधित अर्जदार व्यक्तीला मिळणार आहे. तसेच रेशन कार्ड संबंधित इतर दुरुस्त्या करण्यासही फक्त 30 दिवसांचा वेळ लागणार आहे. यामुळे नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचेल यात शंकाच नाही आणि पैशांची देखील बचत होणार आहे.
अर्जासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
मिळालेल्या माहितीनुसार नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तसेच विभक्त रेशन कार्ड काढण्यासाठी उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला (सातबारा उतारा, लाईट बिल), आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे), शेजारचे रेशनकार्ड झेरॉक्स स्वाक्षरी, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन यांसारखी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.