Maharashtra Rain : आज संपूर्ण देशात लक्ष्मीपूजनाचा आणि दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या आनंदावर अवकाळी पावसाचे विरजण पडण्याची शक्यता आहे.
कारण की, भारतीय हवामान विभागाने लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने मोठा बदल पाहायला मिळत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे.
तापमानातील बदलामुळे गुलाबी थंडीची चाहूल काहीशी कमी झाली आहे. महाराष्ट्रातून थंडी जवळपास गायब झाली आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे.
काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा खरीप हंगामातील काढणीसाठी म्हणजेच हार्वेस्टिंग साठी तयार झालेल्या भात, कापूस सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला आहे.
यामुळे आधीच मानसून काळात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. खरंतर या चालू वर्षी मानसून काळात सरासरीपेक्षा 12% कमी पाऊस परतला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
कमी पावसामुळे सोयाबीन, कापूस समवेतच सर्वच नगदी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. अशातच आता अवकाळी पावसामुळे ऐन काढणीच्या अवस्थेत आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला जाणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अशातच, भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय गोव्यातही आज पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आय एम डी ने आज रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. एकंदरीत यावर्षी अवकाळी पावसातच नागरिकांना दिवाळी सण साजरा करावा लागणार आहे.