Rabi Maize Farming : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रब्बी हंगाम सुरु झाला आहे. यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका तसेच कांदा यांसारख्या विविध पिकांची शेतकरी बांधव लागवड करणार आहेत. काही भागात रब्बी पिकांची पेरणी पूर्ण देखील झाली आहे. गहू, हरभरा यांसारख्या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.
दरम्यान आजची ही बातमी मक्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. राज्यात मक्याची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. रब्बी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगामात मका लागवडी खालील क्षेत्र अधिक आहे.
पण अलीकडे रब्बीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे पीक उत्पादित केले जाऊ लागले आहे. खरंतर रब्बी हंगामात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये मक्याची पेरणी केली जाते.
यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची मका पेरणी झालेली आहे. काही शेतकरी बांधव मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत मक्याची लागवड करतात.
पण सहसा मक्याची पेरणी ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊन जाते. मात्र असे असले तरी आज आपण शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी मक्याच्या महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल आणि सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रब्बी हंगामातील मक्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
गंगा 11 : मक्याचा हा वाण महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरतो. या जातीची एक विशेषता म्हणजे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी हा वाण वापरला जाऊ शकतो. या जातीपासून एकरी 24 ते 28 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळते. मक्याचा हा वाण सरासरी 105 दिवसात परिपक्व होतो. राज्यातील हवामान या जातीला मानवते यामुळे या वाणाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
HQPM5 : मक्याच्या यादेखील जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामासाठी या वाणाची पेरणी करता येते. पण या जातीपासून रब्बी हंगामात अधिकचे उत्पादन मिळते.
या जातीपासून एकरी 32 ते 36 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. पण या जातीचा रब्बी हंगामातील पीक परिपक्व कालावधी हा तब्बल 160 ते 170 दिवसांचा राहतो. म्हणजेच मक्याचा हा वाण उशिराने परिपक्व होणारा आहे.
HM 10 : मक्याचा हा देखील वाण रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामांसाठी वापरला जाऊ शकतो. मक्याचे ही देखील एक सुधारित आणि महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल अशी जात आहे. या जातीपासून एकरी 36 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना सहजतेने मिळू शकते.
मात्र या जातीचा पीक परीपक्व कालावधी हा इतर जातीपेक्षा अधिक आहे. या जातीचे पीक परिपक्व होण्यासाठी 160 दिवस लागतात. मात्र उत्पादनात ही जात इतर जातीच्या तुलनेत अधिक सरस असल्याने बहुतांशी शेतकरी बांधव या जातीच्या लागवडीस पसंती दाखवतात.