Rabi Jowar Variety : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. आज मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आता रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होणार आहे.
कमी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असल्याने आता शेतकऱ्यांची सारी भिस्त रब्बी हंगामावरच राहणार आहे. आगामी काळात चांगला पाऊस झाला तसेच परतीचा पाऊस देखील चांगला बरसला तर रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते, असा आशावाद आता व्यक्त होत आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारीची लागवड होण्याची शक्यता देखील आहे.
अशा स्थितीत आज आपण कोरडवाहू ज्वारीच्या सुधारित जाती कोणत्या आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरडवाहू पेरणीची 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात केली जाते. या कालावधीत कोरडवाहू ज्वारीची पेरणी केली तर चांगले उत्पादन मिळते.
कोरडवाहू ज्वारीच्या सुधारित जाती
फुले यशोमती : हा वाण हलक्या कोरडवाहू जमिनीसाठी उपयुक्त ठरतो. हा महाराष्ट्रात उत्पादित होणारा एक प्रमुख वाण असून या वाणाची पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीपासून 9.2 क्विंटल प्रति हेक्टर एवढे धान्याचे उत्पादन मिळते. पेरणी केल्यानंतर साधारणतः 112 ते 115 दिवसात हा वाण परीपक्व होतो.
फुले अनुराधा : फुले अनुराधा हा देखील ज्वारीचा एक सुधारित प्रकार आहे. या जातीची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरडवाहू क्षेत्रासाठी तसेच हलक्या जमिनीसाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. पेरणी केल्यानंतर साधारणता 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक परीपक्व बनते. कोरडवाहू क्षेत्रात या जातीपासून आठ ते दहा क्विंटल प्रति हेक्टरपर्यंतचे उत्पादन मिळते.
फुले वसुधा : महाराष्ट्रात उत्पादित होणारा हा ज्वारीचा एक सुधारित वाण आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी याची शिफारस केली जाते. मात्र या जातीची लागवड भारी जमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो.
भारी जमिनीत या जातीपासून चांगले उत्पादन मिळते. या जातींचे पीक 116 ते 120 दिवसात परिपक्व होते. बागायती भागात या जातीपासून हेक्टरी 30 ते 32 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. तसेच कोरडवाहू भागात या जातीपासून 24 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे धान्याचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.