Pune Successful Farmer : पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला पुणे जिल्हा सुंदरतेने परिपूर्ण आहे. हा जिल्हा एक सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी बांधव विविध नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात. जिल्ह्यात प्रामुख्याने भात, ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा यांसारख्या पिकांची लागवड पाहायला मिळते. मात्र झाडांची शेती कोणीही करत नाही. चंदन, मलबार निम, निलगिरी यांसारख्या झाडांची फारशी लागवड पाहायला मिळत नाही. मात्र पुणे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चंदन लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
या शेतकऱ्याला आता येत्या तीन-चार वर्षात करोडो रुपयांची कमाई होईल असा अंदाज आहे. इंदापूर तालुक्यातील मौजे बेलवाडी येथील शहाजी धोंडीबा शिंदे यांनी ही किमया साधली आहे. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 2017 मध्ये चंदन लागवडीचा प्रयोग केला आहे. तसेच 2018 मध्ये चंदनाच्या शेतीत मिलीया डुबिया या जातीची झाडांची लागवड केली आहे. अर्थातच चंदन लागवड करून आता त्यांना जवळपास सात वर्षांचा काळ झाला आहे. चंदन दहा वर्षानंतर हार्वेस्टिंगसाठी तयार होते. म्हणजे येत्या तीन ते चार वर्षात त्यांना चंदनापासुन उत्पादन मिळणार आहे.
शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या सव्वा एकर शेत जमिनीत म्हणजेच 50 गुंठे जमिनीत पारंपारिक पिकांची लागवड करण्याऐवजी दापोली येथून चंदनाची रोपे खरेदी करून आणली आणि ती लावलीत. 50 गुंठ्यात 330 रोपांची लागवड झाली. या चंदनाच्या बागेतच त्यांनी मिलीया डुबिया या झाडाची 200 झाडे देखील लावली आहेत. ही झाडे लावण्याचे कारण म्हणजे चंदन हे परजीवी आहे. यामुळे चंदनाच्या शेजारी दुसरे झाड लावणे आवश्यक असते. विशेष म्हणजे या 50 गुंठ्यात चंदन आणि मिलिया डुबिया या झाडांमध्ये त्यांनी पेरूची देखील लागवड केली आहे.
या पेरू पासून त्यांना दरवर्षी 35 ते 40 हजारापर्यंत चे उत्पन्न मिळत आहे. 50 गुंठ्यात लावलेल्या या चंदनाच्या झाडांपासून त्यांना करोडो रुपयांची कमाई होणार आहे तर मिलीया डुबिया या झाडातूनही त्यांना लाखो रुपये मिळण्याची आशा आहे. मात्र चंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळे त्यांच्या शेतातील चंदनाची चोरी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्यांनी शेतात कंपाऊंड केले आहे सोबतच सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत.