Pune Successful Farmer : पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यातील एका शेतकऱ्याने चक्क एकरी १३८ टन उसाचे उत्पादन मिळवून दाखवले आहे. यामुळे सध्या पुण्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
खरतर अलीकडे शेतीमध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले तरुण शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत. शेती परवडत नाही, शेती करून फक्त पोट भरेल ? असे बोलले जात आहे.
पण फक्त पारंपारिक पिकांची शेती न करता वेगवेगळ्या नगदी पिकांची शेती केली तर शेतीमधून चांगली कमाई करता येऊ शकते. पुणे जिल्ह्यातील पणदरे भागातील सोनकसवाडी येथील शेतकरी संजय जगताप यांनी हे दाखवून दिले आहे.
वास्तविक जगताप पुण्यात वकीली करतात. ते एक उत्कृष्ट वकील आहेत. मात्र आपल्या व्यवसायासोबतच त्यांनी शेती व्यवसाय देखील सुरूच ठेवला आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळणार आहे.
जगताप हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे उसाच्या आधी त्यांनी केळीची बाग लावलेली होती. केळीचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी केळी बाग काढली आणि त्या जागी उसाची लागवड केली. को 86032 या वाणाची लागवड करण्यात आली.
4200 गन्ना मास्टर रोपांची आडसाली हंगामात लागवड केली. रोपांमध्ये दीड फूट एवढे अंतर ठेवले. रोपांची लागवड झाल्यानंतर पिकाची बांधणी आणि तगारणी झाल्यावर योग्य प्रमाणात रासायनिक खते आणि औषधे देण्यात आली. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणाली बसवली होती.
यामुळे उसाच्या पिकाची चांगली जोमदार वाढ झाली. उसाचे त्यांनी एकरी तब्बल 138 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. या कामी त्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे एडवोकेट जगताप यांच्या ह्या प्रयोगाची भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी देखील दखल घेतली आहे.
पवार यांनी जगताप यांच्या बांधावर हजेरी लावून त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे एडवोकेट जगताप यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यांना पुढे आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी आता मोठी प्रेरणा मिळाली आहे. निश्चितच वकिली पेशा सांभाळात शेतीमध्ये केलेली ही कामगिरी आणि मिळवलेल यश इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.