Pune Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू आहे. राज्यातील वादळी पावसाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांसमवेतच सर्वसामान्य नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार असा अंदाज दिला आहे.
पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून वादळी पाऊस सुरू असून यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील काही भागांमध्ये घरांवरील पत्रे उडाले आहेत तर काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत.
दरम्यान पुणेकरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज आणि उद्या पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरातील अनेक भागात आज संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
खरे तर गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरासहित जिल्ह्यात सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे उकाड्याने हैरान जनतेला दिलासा मिळाला आहे परंतु शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसासह जोरदार वादळी वारा देखील वाहत असल्याने अनेक ठिकाणी मोठे आर्थिक नुकसान पाहायला मिळाले आहे. आज देखील पुण्यात अशीच परिस्थिती राहणार आहे. आज सायंकाळच्या सुमारास पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज पुण्यात दिवसभर कडक ऊन राहील मात्र सायंकाळी वातावरणात अचानक बदल होईल आणि मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आयएमडीने जाहीर केला आहे.
राजधानी मुंबईत देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. मुंबई शहर, पालघर आणि ठाण्यासाठी म्हणजेच उत्तर कोकणासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर कोकणात दिवसभर उष्णतेची लाट राहणार आहे परंतु सायंकाळी मुसळधार पाऊस बरसणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सायंकाळच्या सुमारास पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर आज दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या 7 जिल्ह्यांमध्ये, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.