Pune Weather Department : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर पाहायला मिळत आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पावसाचे तांडव सुरू आहे.
म्हणजेच देशात विरोधाभासी वातावरण तयार झालेले आहे. आपल्या राज्यात सुद्धा अशीच परिस्थिती कायम होती. राज्यात या चालू नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने झाली.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत होता. आता मात्र अरबी समुद्रातील ही प्रणाली निवळली आहे.
यामुळे राज्यात अवकाळी पावसाचे सत्र आता पूर्णपणे थांबलेले आहे. दरम्यान पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
आगामी दोन दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, अवकाळी पाऊस हजेरी लावणार का, थंडीचा जोर कसा राहणार याबाबत पुणे वेधशाळेच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, आता राज्यावर कोणतीच हवामान प्रणाली सक्रिय नाहीये. यामुळे आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होणार नाही.
नववर्षाच्या सुरुवातीपासून दाखल झालेला अवकाळी आता विश्रांती घेणार आहे. अवकाळी पावसाचे सत्र आता पूर्णपणे थांबणार असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आता महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आता आकाश निरभ्र राहील आणि हवामान मुख्यता कोरडे राहणार आहे. काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे.
पुढील दोन-तीन दिवस अर्थातच 16 जानेवारी पर्यंत किमान तापमानात जवळपास चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंतची घट होईल असा अंदाज आहे. तर दुसरीकडे कमाल तापमानात देखील थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे शहर आणि परिसरात देखील अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. पुण्यातही हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, आकाश नीरभ्र राहील आणि थंडीचा जोर वाढणार असे वेधशाळेने नमूद केले आहे.