Pune Weather Department : नैऋत्य मोसमी वाऱ्याने अर्थातच मान्सूनने देशातून आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यातून मान्सून माघारी फिरत आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरणार आहे. मात्र असे असले तरी सध्या महाराष्ट्रात मोसमीं पावसाचा जोर कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात गणेश उत्सवाच्या सुरुवातीपासून पावसाने जोर धरला असून संपूर्ण गणेशोत्सवात मनसोक्त बरसला आहे. यामुळे राज्यातील पाण्याचे संकट बऱ्यापैकी कमी झाले आहे. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. याचा परिणाम म्हणून वाया गेलेला हंगामा आता पुन्हा एकदा नवीन उभारी घेणार असा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आगामी रब्बी हंगामाला देखील याचा मोठा फायदा होणार आहे. खरंतर भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात मान्सूनचा पाऊस बरसतो. यंदा मात्र या चार महिन्यांच्या काळापैकी दोन महिन्यात राज्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात फारसा पाऊस झालेला नाही.
यामुळे ऑगस्टपर्यंत राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. मात्र सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला असल्याने राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला असून यामुळे आता रब्बी हंगामात या पाण्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट देखील दूर झाले आहे. अशातच पुणे वेधशाळेने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
ती म्हणजे आज 30 सप्टेंबर अर्थातच शनिवारी राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने शनिवारी राज्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात अचानक तयार झालेल्या चक्रीवादळामुळे सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.
या चक्रीवादळामुळे गोव्यात आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गोव्याला आणि कोकण किनारपट्टीला पुणे वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.