Pune Vande Bharat Train : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्यात. यातील एक गाडी महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. खरंतर, आधीच महाराष्ट्राला सात वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या होत्या.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
म्हणजेच आता मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद ही नवीन ट्रेन पकडून महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आठवर पोहोचली आहे.
यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे सुरु आहे. परंतु थेट पुणे रेल्वे स्थानकावरून अजून एकही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही.
यामुळे थेट पुणे रेल्वे स्थानकावरून देखील ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी प्रवाशांची आहे. विशेष म्हणजे प्रवाशांची ही मागणी आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कारण की, नवीन आर्थिक वर्षात अर्थातच आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आता आपण पुण्याला कोणत्या चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकतात, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुण्याला मिळणार चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचं झालं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असलेल्या पुणे शहराला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
विशेष म्हणजे या गाड्या डिसेंबर 2024 अखेरपर्यंत किंवा मार्च 2025 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या चार मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.
निश्चितच, जर या चार मार्गांवर ही गाडी सुरू झाली तर पुणेकरांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे.